‘मिशन स्कॉलरशिप’ पॅटर्न जिल्हाभर राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 09:59 PM2020-06-30T21:59:55+5:302020-06-30T22:01:11+5:30
घटकसंच नियोजनाचे प्रकाशन आमदार राजू कारेमोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस, शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर, महिला व बालकल्याण सभापती रेखा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य अरविंद राऊत, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रकाश करणकोटे, माध्यमिक शिक्षणाधिकारी दिलीप वाघाये यांच्या उपस्थितीत बुधवार १ जुलै रोजी सिहोरा येथील जिल्हा परिषद हायस्कुल येथे होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल उंचाविण्यासाठी मिशन स्कॉरलशिप हा तुमसर पॅटर्न जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. गत सत्रात तुमसरमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर याची दखल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली आहे. लोकसहभाग आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल उंचाविला जाणार आहे.
गत शैक्षणिक सत्रात तुमसर तालुक्यात मिशन स्कॉरलशिप हा प्रयोग राबविण्यात आला होता. विद्यार्थी व शिक्षकांसाठी उपयुक्त शिष्यवृत्ती परीक्षेचे घटकसंच तुमसरचे गटशिक्षणाधिकारी विजय आदमने व गटसंसाधन व्यक्तींनी तयार केला आहे. या घटकसंच नियोजनाचे प्रकाशन आमदार राजू कारेमोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस, शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर, महिला व बालकल्याण सभापती रेखा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य अरविंद राऊत, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रकाश करणकोटे, माध्यमिक शिक्षणाधिकारी दिलीप वाघाये यांच्या उपस्थितीत बुधवार १ जुलै रोजी सिहोरा येथील जिल्हा परिषद हायस्कुल येथे होणार आहे. या घटकसंच नियोजना पाचवी व आठवीसाठी प्रत्येक आठवड्यात कुठला घटक शिकवायचे याचे नियोजन करण्यात आले आहे. दररोज शालेय वेळात दुपारी ३ ते ५ या कालावधीत शिष्यवृत्ती वर्ग या घटकांवर आधारित घ्यावयाचे आहे. दर पंधरवाड्याला एक सराव चाचणी झालेल्या घटकावर घेण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत केंद्रातील व बीट मधील हुशार, होतकरू विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन नि:शुल्कपणे डिसेंबर व जानेवारी महिन्यात प्रत्येक रविवारी सकाळी ९ ते १२ या वेळात घेण्यात येणार आहे. यासाठी सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांची निवड गटशिक्षणाधिकारी स्थळावर करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत पाच पेपर शाळास्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. मिशन स्कॉलरशिप अंतर्गत अनिवासी शिबिर घेतले जाणार आहे.
लोकसहभागातून उपक्रम
मिशन स्कॉलरशिप या उपक्रमासाठी लोकसहभाग तेवढाच महत्वाचा आहे. शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांच्या सहकाºयाने हा उपक्रम राबविला जाणार आहे. तसेच ग्रामपंचायतीकडूनही या उपक्रमासाठी निधी मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेतील टक्का वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग पुढाकार घेत आहे.