अवैध धंद्यांवरून आमदार कारेमोरे आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:40 AM2021-08-25T04:40:17+5:302021-08-25T04:40:17+5:30
मोहाडी ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती नागरिकांनी आमदार राजू कारेमोरे यांना देऊन लक्ष घालण्याची विनंती केली होती. ...
मोहाडी ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती नागरिकांनी आमदार राजू कारेमोरे यांना देऊन लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यावरून आमदारांनी मंगळवारी मोहाडी ठाणे गाठले. गाठून सर्वांची खरडपट्टी काढली. नेहमी शांत दिसणारे आमदार आक्रमक झाले होते. यावेळी ठाणेदारांशी चर्चा करून अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळण्यात येतील, असे आश्वासन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी दिले. आठ दिवसांत कारवाई करण्यात आली नाही तर आंदोलन करण्याची तंबीही आमदारांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे, विजय पारधी, पुरुषोत्तम पात्रे, तारा हेडाऊ, बबलू सय्यद, श्याम कांबळे, सचिन कारेमोरे, सुनील चवळे, सिराज शेख, भूपेंद्र पवनकर, सचिन गायधने आदी उपस्थित होते.
बाॅक्स
रेतीचा ट्रक पकडला
पोलीस ठाण्यातून चर्चा करून बाहेर निघत असताना कार्यकर्त्यांना ठाण्यासमोरून रेती भरून जाणारा टिप्पर दिसला. त्यांनी तो टिप्पर थांबविला व लगेच पोलिसांना बोलाविले. टिप्परचालक तेजराम साकुरे याच्या जवळ रेतीचा परवाना आढळला नाही. त्यामुळे टिप्पर ठाण्यात लावण्यात आला. तसेच या प्रकरणाची सूचना तहसीलदारांना देण्यात आली आहे.
रेती तस्कारांची दिली यादी
कार्यकर्त्यांनी जवळपास ३० टिप्पर मालक कोणकोणत्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना किती किती रुपये एन्ट्री देतात, याची यादीच टिप्पर क्रमांकासाहित व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नावासह उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षकांना सोपविली आहे. या यादीतील नावे व रक्कम पाहून उपस्थितांचे डोके चक्रावल्याशिवाय राहले नाही.