आमदार आदर्श ग्राम विकासात्मक योजना

By admin | Published: November 28, 2015 01:48 AM2015-11-28T01:48:07+5:302015-11-28T01:48:07+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना प्रणित युती सरकारने कार्यान्वीत केलेली आमदार आदर्श ग्राम ही विकासात्मक योजना असून ...

MLA Model Village Development Plan | आमदार आदर्श ग्राम विकासात्मक योजना

आमदार आदर्श ग्राम विकासात्मक योजना

Next

वाघमारे यांचे प्रतिपादन : सभेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भंडारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना प्रणित युती सरकारने कार्यान्वीत केलेली आमदार आदर्श ग्राम ही विकासात्मक योजना असून शासनाच्या लोककल्याणकारी कार्यात लोकांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी केले.
मोहाडी तालुक्यातील खमारी बुज येथे आयोजित जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.
अध्यक्षस्थानी आमदार चरण वाघमारे होते. यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, तुमसरच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले, खमारीच्या सरपंच बाना सव्वालाखे, उपसरपंच महेश दमाहे, ग्रामपंचायत सदस्य सचिन बागडे, द्वारका सव्वालाखे, गीता माहुले, सविता दमाहे, वनिता दमाहे, कुवरलाल दमाहे, सोविंदा माहुले, सावलदास दमाहे, उपस्थित होते.
यावेळी आमदार वाघमारे म्हणाले, युती सरकार सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध असून विकासात्मक योजना कार्यान्वीत करण्यात आलेल्या आहेत. आमदार आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून खमारी गावात कृषी, सिंचन, रस्ते, वीज, पाणी, पशुसंवर्धन, दुग्धोत्पादन, पाळीव दुधाळ जनावरे, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, व्यसनमुक्ती, गुटखाबंदी यासारख्या विविध प्रकारच्या योजना कार्यान्वीत करून विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. खमारी ग्रामवासीयांनी आमदार आदर्श गाव अभियानात सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले, नागरिकांनी संत महात्मे आणि थोरपुरूषांच्या सम्यक आदर्शवत विचारांचे अनुकरण करून आणि ते विचार प्रत्यक्ष आचरणात आणून व्यसनापासून अलिप्त राहावे तसेच शासन आणि प्रशासनाच्या लोककल्याणकारी विकासात्मक योजनेत सक्रीय सहभाग दर्शवून विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, तुमसरच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सर्व विभागाचा आढावा घेण्यात आला. (नगर प्रतिनिधी)

Web Title: MLA Model Village Development Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.