धीरेंद्र शास्त्रींवर कारवाईच्या मागणीसाठी निघालेले आमदार नरेंद्र भोंडेकर पोलिसांच्या ताब्यात
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: March 31, 2024 05:53 PM2024-03-31T17:53:03+5:302024-03-31T17:53:36+5:30
शेकडो सेवकांसह निघाले होते मोहाडीकडे : मार्गात पोलिसांनी अडविले. परमात्मा एक सेवक उतरले रस्त्यावर : शास्त्री यांच्या तात्काळ अटकेची मागणी.
भंडारा : मोहाडी येथे सुरू असलेल्या प्रवचनादरम्यान बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री यांनी सलग दोन दिवस मानव सेवा धर्माविरूद्ध केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद सर्वत्र उमटले आहे. त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करा आणि तातडीने अटक करा, या मागणीसाठी हजारोंच्या संख्येतील सेवकांनी रविवारी दुपारी मोहाडीकडे कूच केले. त्यांच्यासोबत निघालेले आमदार नरेंद्र भोंडेकर आणि अन्य सेवकांना पोलिसांनी वाटेतच अडवून ताब्यात घेतले.
दरम्यान, मोहाडी पोलिस स्टेशनवर हजारांवर सेवकांचा जमाव पोहचला असून धीरेंद्र शास्त्री महाराजांना अटक करण्याची मागणी होत आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी प्रवचन सोहळ्यात धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी धार्मिक प्रवचनादरम्यान मानवता सेवा धर्माविरूद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करून मोहाडी पोलिसात तक्रार तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारच्या प्रवचनात महाराजांनी पुन्हा आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे बराच क्षोभ पसरला आहे.
प्रवचन स्थळी पोलिस बंदोबस्त
तणावाची स्थिती लक्षात घेऊन मोहाडीतील प्रवचन स्थळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. प्रवचनस्थळी धीरेंद्र शास्त्री यांचे समर्थक जमलेले आहे. तर मोहाडी पोलिस ठाण्यात तसेच चौकात सेवकांची मोठी गर्दी आहे. दोन्ही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक लोहीत मतानी स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेऊन घटनास्थळी आहेत.
हा तर आचारसंहितेचा भंग : आमदार भोंडेकर
निवडणूक काळात धार्मिक विवाद उत्पन्न होईल, असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. तरीही धीरेंद्र शास्त्री हे सामाजिक तेढ पसरविणारे वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवून अटक करावी. या कार्यक्रमाला परवानगी देणाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी मोहाडीला निघण्यापूर्वी पत्रकार परिषदेतून केली.