आमदार-जि. प. सदस्य यांच्या वादात रखडले रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2016 12:31 AM2016-04-02T00:31:23+5:302016-04-02T00:31:23+5:30
या रस्त्याचे काम आमचे. त्या रस्त्याचे काम तुमचे, या आमदार व जिल्हा परिषद सदस्यातील वादात सावरी-...
कामे ठप्प : प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात
जवाहरनगर : या रस्त्याचे काम आमचे. त्या रस्त्याचे काम तुमचे, या आमदार व जिल्हा परिषद सदस्यातील वादात सावरी-जवाहरनगर परिसरातील ग्रामीण रस्ते रखडले आहेत. परिणामी ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.
जनतेची कामे जलदगतीने व्हावे, या हेतूने परिसरातील जनतेनी लोकप्रतिनिधी निवडले. परंतु जिल्हा परिषद शाळा पेवठा येथे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमातंर्गत कार्यक्रमाच्या समारोपात हा मुद्दा समोर आला. यावेळी आमदार रामचंद्र अवसरे म्हणाले, पेवठा-कोंढी हा रस्ता मंजूर झाला आहे. मात्र स्थानिक जिल्हा परिषद सदस्य आम्हाला रस्ता बांधकामासाठी एनओसी देत नसल्याचे बोलून टाकले.
आमचा पैसा आम्हीच वापरू, आमच्याकडे रस्ते तयार करणारी यंत्रणा आहे. तशी यंत्रणा जिल्हा परिषदेकडे नाही. जिल्हा परिषदेनी तयार केलेले रस्ते ही दीर्घकाळ टिकावू नाही वा वेळेच्या आत काम पूर्ण करीत नाही. आता जनताच ठरविणार रस्ता कोणाचा चांगला असतो, असे सांगितले. मागीलवेळी जिल्हा परिषदेवर भाजपा सेनेची सत्ता होती. त्या काळात तत्कालीन सभापती चरण वाघमारे यांनी दोन गावांना जोडणारे रस्ते व ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते अर्थात ओडीआर व व्हीआर हे रस्ते जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम मालकीचे आहेत. हक्काचा पैसा आम्हाला मिळाला पाहिजे यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. यात चरण वाघमारे यांच्या बाजूने निकाल लागला होता. (वार्ताहर)
जिल्हा परिषदेतही सार्वजनिक बांधकाम खाते आहे. आमच्याकडे यंत्रणा असून आम्ही रस्ते तयार करू शकतो. ३०-५४ व ५०-५४ चा हक्क आमचा आहे. हा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कोंढी ते जिल्ह्याची सीमा गोवरी, कारखाना ते लोहारा, पेवठा ते कोंढी रस्ता मंजूर आहे. मात्र आमदार आम्हाला आमच्या हक्काचा पैसा देत नाही. ९ कोटी रूपये जिल्हाधिकारी दालनात पडून आहे.
- प्रेमदास वनवे,
जि.प. सदस्य, सावरी जवाहरनगर.