आमदार राजू कारेमाेरेंची भंडारा कारागृहातून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 10:38 AM2022-01-04T10:38:42+5:302022-01-04T10:48:21+5:30
माेहाडी ठाण्यात गाेंधळ घालून पाेलिसांना अश्लील शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात आमदार राजू कारेमाेरे यांना साेमवारी दुपारी भंडारा येथे अटक करण्यात आली होती.
भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांची भंडारा कारागृहातून मंगळवारी सकाळी सुटका झाली. सोमवारी अटकेनंतर जिल्हा न्यायालयाने जामिन मंजूर केला होता. मात्र आदेश वेळेत मिळाला नाही. त्यामुळे त्यांना सोमवारची रात्र कारागृहात काढावी लागली. अश्लील शिवीगाळ प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती.
३१ डिसेंबरच्या रात्री दाेन व्यापाऱ्यांना मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी आमदार राजू कारेमाेरे माेहाडी पाेलीस ठाण्यात गेले हाेते. त्याठिकाणी त्यांनी प्रचंड गाेंधळ घालत पाेलिसांना अश्लील शिवीगाळ केली. या शिवीगाळीचा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, रविवारी पत्रकार परिषद घेऊन या प्रकाराबद्दल माता-भगिनींची माफीही मागितली हाेती.
साेमवारी त्यांना भंडारा येथे चाैकशीसाठी बाेलाविण्यात आले हाेते. तेथे चाैकशी केल्यानंतर त्यांना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा, अश्लील शिवीगाळ आणि महिलांना लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य केल्याचा आरोप ठेवत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.