आमदाराला माजी आमदार पुत्राची मारहाण, तुमसर येथील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 09:40 PM2018-01-31T21:40:43+5:302018-01-31T21:49:04+5:30
तुमसर नगरपालिकेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांची सभा होऊ घातलेल्या जागेच्या वादातून भाजपचे आमदार चरण वाघमारे आणि माजी आमदार सुभाषचंद्र कारेमोरे यांचा मुलगा अस्थी विकारतज्ज्ञ डॉ.पंकज कारेमोरे यांच्यात बुधवारला दुपारी ४ वाजताच्या सुमारास वाद झाला.
तुमसर (भंडारा) : तुमसर नगरपालिकेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांची सभा होऊ घातलेल्या जागेच्या वादातून भाजपचे आमदार चरण वाघमारे आणि माजी आमदार सुभाषचंद्र कारेमोरे यांचा मुलगा अस्थी विकारतज्ज्ञ डॉ.पंकज कारेमोरे यांच्यात बुधवारला दुपारी ४ वाजताच्या सुमारास वाद झाला. वादाचे पर्यवसान धक्काबुक्की आणि त्यानंतर मारहाणीत झाले. या घटनेमुळे तुमसरात तणावपूर्ण स्थिती असून डॉक्टरविरूद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी आमदार समर्थकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.
तुमसर नगरपालिकेला १५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ४ फेब्रुवारीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप कार्यक्रम होणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्याची सभा ज्याठिकाणी होणार आहे त्या जागेची पाहणी करण्यासाठी आणि मंडप उभारणीच्या कामाची पाहणी आ.चरण वाघमारे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, नगरसेवक श्याम धुर्वे, पंकज बालपांडे हे करीत होते. यावेळी डॉ.पंकज कारेमोरे यांनी समारोपीय कार्यक्रमासाठी सभेच्या ठिकाणी असलेले १५ फूट उंचीचे झाडे तोडू नका, असे म्हणत विरोध दर्शविला. त्यातच त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. त्यानंतर डॉ.कारेमोरे यांनी आमदार वाघमारे यांची कॉलर पकडून ओढताण केली. क्षणात नगराध्यक्षांसह अन्य नगरसेवकांनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता डॉ.कारेमोरे यांनी त्यांनाही धक्काबुक्की केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनीही डॉ.कारेमोरे यांना मारहाण केली. त्यानंतर आ.चरण वाघमारे यांनी कार्यकर्त्यांसह तुमसर पोलीस ठाणे गाठून डॉ.कारेमोरे यांना अटक करण्याची मागणी केली.
या घटनेची माहिती शहरात पसरताच भाजपचे शेकडो कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमा झाले. तणावपूर्ण स्थितीत डॉ.कारेमोरे यांना पोलीस ठाण्यात आणले असता भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी डॉ.कारेमोरे यांना काहीही न होता पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी भाजप कार्यकर्ते पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडून बसले होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून तुमसर पोलिसांनी भंडाराहून अतिरिक्त कुमक बोलविली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. याप्रकरणी भाजपचे नगरसेवक श्याम धुर्वे यांच्या तक्रारीवरून तुमसर पोलिसांनी डॉ.कारेमोरे यांच्याविरूद्ध भादंवि ३५३, २९४, ५०६, ३२३ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सभेची तयारी पाहण्यासाठी मैदानात गेले असता डॉ.पंकज कारेमोरे यांनी शाब्दिक वाद करीत धक्काबुक्की केली. त्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी धरणे दिले.
-चरण वाघमारे,
आमदार, तुमसर.
मुख्यमंत्र्यांची सभा एवढी मोठी नाही की त्याकरिता ७० झाडे कापली जावी. झाडे कापण्याचा विरोध दर्शविल्याने आमदारांनी शिवीगाळ करून तेच माझ्या अंगावर आल्याने मी त्यांची कॉलर पकडली.
-डॉ.पंकज कारेमोरे,
अस्थीविकार तज्ज्ञ तुमसर.
आ.वाघमारे यांना डॉ.कारेमोरे यांनी धक्काबुक्की केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा तपास व चौकशी सुरू आहे. चौकशीत दोषीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-गजानन कंकाळे,
पोलीस निरीक्षक, तुमसर.