विकासाच्या नवनिर्माणासाठी ‘मनसे’ योग्य पर्याय
By Admin | Published: November 6, 2016 12:32 AM2016-11-06T00:32:29+5:302016-11-06T00:32:29+5:30
आजपर्यंत विविध राजकीय पक्षांनी मतांचे राजकारण केले. भंडारा नगरापालिका निवडणुकीत मतदारांना भुलथापा देऊन केवळ कागदोपत्री विकास दाखविण्यात आला.
हेमंत गडकरी यांचे प्रतिपादन : कार्यकर्ता मेळावा, चाहूल पालिका निवडणुकीची, अनेकांचा पक्षप्रवेश
भंडारा : आजपर्यंत विविध राजकीय पक्षांनी मतांचे राजकारण केले. भंडारा नगरापालिका निवडणुकीत मतदारांना भुलथापा देऊन केवळ कागदोपत्री विकास दाखविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहराचा कायापालट झालेला नाही. अशा संधीसाधू राजकीय पक्षांना दूर सारून भंडारा शहराच्या विकासाच्या नवनिर्माणाची मुहुर्तमेढ रोवण्याची आता पालिका निवडणुकीत शहरवासीयांना संधी आली आहे. मनसेच्या साथीने या संधीचे सोने करावे असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी केले.
भंडारा शहरातील जलाराम मंगल कार्यालयात मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आढावा मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. मेळाव्याला मनविसेचे विभागीय संघटक मंगेश ढुके, मनसे जिल्हाध्यक्ष विजय शहारे, महिला जिल्हाध्यक्ष मंगला वाडीभस्मे, नितीन वानखेडे, दिनेश बारापात्रे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना गडकरी यांनी आगामी पालिका निवडणुकीसाठी मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. आजपर्यंत शहरवासीयांना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप-सेना या पक्षानी मिळालेल्या संधीचा लाभ शहरविकासासाठी केला नाही. सत्तेच्या माध्यमातून पैसा व पैशाच्या माध्यमातून सत्ता याशिवाय या मंडळींना काहीही जमले नाही. जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून आता हे राजकीय पक्ष पुन्हा एकदा मतांचा जोगवा मागण्यासाठी मतदारांपुढे येणार आहेत. त्यांचा नैतिक अधिकार संपला असल्याने शहराच्या विकासासाठी आता केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशिवाय पर्याय नाही. या पर्यायाची संधी मनसेला द्यावी, नाशिक शहराचा चेहरा मोहरा बदलविणाऱ्या मनसेच्या माध्यमातून भंडाऱ्यातही कार्य करण्याची संधी मिळेल असा आशावाद यावेळी गडकरी यांनी व्यक्त करताना आगामी पालिका निवडणुकीपूर्वी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे व बाळा नांदगावकर यांना या भागात नक्की आणण्याचा प्रयत्न करू. मात्र त्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी कसोशीने मेहनत घ्यावी असे मार्गदर्शन केले.
निवडणुकीच्या पूर्वीपासूनच सर्वांनी प्रभागातील समस्या व जनहितार्थ कामे करून लोकांची मने जिंकल्यास पालिकेवर मनसेचा झेंडा नक्कीच फडकेल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे असे मार्गदर्शनात म्हटले. यावेळी मंगेश ढुके यांनी सर्वांनी हेवेदावे विसरून पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे व आगामी निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करण्याचे प्रतिपादन केले.
जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांनी भंडारा पालिकेचा भोंगळ कारभार व शहराच्या दयनीय अवस्थेला सत्ताधारी जबाबदार असून त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. शहराच्या विकासासाठी युवक युवतींनी मनसेचे समर्थन करावे. आगामी पालिका निवडणुकीत पक्ष योग्य उमेदवारांची निवड करून मतदारांपर्यंत पोहचणार आहेत. सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून पालिकेत मनसेला एक हाती सत्ता दिल्यास शहराचा चेहरा मोहरा बदलवून दाखवू असे अभिवचन शहारे यांनी यावेळी दिले.
मंगला वाडीभस्मे यांनी शहरात महिलांकरिता सोयी सुविधा नसल्याची खंत व्यक्त केली. तर नितीन वानखेडे यांनी शहरात होणाऱ्या शुद्ध पाणी पुरवठ्याविषयी शंका उपस्थित करून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यावेळी त्यांनी व्यक्त केला. या मेळाव्यात अनेकांनी मनसेत प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष दिनेश बारापात्रे, महिला जिल्हा सचिव शोभा बावनकर, महिला शहर अध्यक्ष विभा साखरकर, सोमेंद्र शहारे, ज्ञानेश्वर पोगळे, सुकराम तिवाडे, अतुल भुरे, तुर्रम गोन्नाडे, अभिषेक राजदेरकर, शुभम बारापात्रे, मनिष पडोळे, सचिन शहारे, दादू चौधरी, अक्षय आदमने, रुपेश हेडाऊ, दिनेश भोयर, मनोज दमाहे, दिलीप तांडेकर, छाया माहुले, प्रमिला डोरले, प्रिती मेश्राम, शुभांगी वंजारी, ज्योती रामटेके, तनिषा खोब्रागडे, शबाना शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन सोमेंद्र शहारे यांनी केले तर आभार दिनेश बारापात्रे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)