भंडाऱ्यात मुख्याध्यापकाचा मोबाईलच्या स्फोटात मृत्यू; बाईक चालवत असतानाच झाला स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2024 05:28 PM2024-12-07T17:28:34+5:302024-12-07T17:37:05+5:30
मोबाईलच्या स्फोटात एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे.
Principal Died In Mobile Blast : मोटारसायकल चालवत असताना खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्यानं त्यात गंभीर जखमी होऊन मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तर मुख्याध्यापकाच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून मोबाईलचा स्फोट नेमका कसा झाला याचा शोध सुरु करण्यात आला आहे.
भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सानगडी नजीक असलेल्या सिरेगावटोला येथे ही धक्कादायक घटना घडली. सुरेश संग्रामे (वय ५५) असं मृतक मुख्याध्यापकाचं नाव आहे. सुरेश संग्रामे हे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. तर नत्थु गायकवाड (५६) असं गंभीर जखमी असलेल्या मागे बसलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जखमी नत्थु गायकवाड यांच्यावर सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत सुरेश संग्रामे आणि गंभीर जखमी नत्थु गायकवाड हे नातेवाईक असून दोघेही भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सिरेगावटोला येथील रहिवासी आहेत. दोघेही मोटारसायकलवरुन नातेवाईकाच्या एका कार्यक्रमासाठी अर्जुनी मोरगावकडं जात असताना ही घटना घडली.
खिश्यात मोबाइलाचा स्फोट झाल्यानंतर सुरेश संग्रामे यांच्या कपड्याला आग लागली होती. भाजल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या मागे बसलेले नत्थु गायकवाड हे गाडीवरुन पडल्याने ते गंभीर जखमी झालेत. त्यांना भंडारा येथील लक्ष हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मोबाईलची बॅटरी जास्त गरम झाल्यामुळे स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस आता पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, तज्ञांच्या म्हणण्यांनुसार अनेक कारणांनी मोबाईलचा स्फोट होऊ शकतो. मात्र यातील प्रमुख कारण म्हणजे मोबाईलची बॅटरी आहे. मोबाईल अनेक तास चार्जिंगला ठेवल्याने बॅटरीचा स्फोट होऊ शकतो. तर मोबाईल जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहिल्यास बॅटरी जास्त गरम होऊन स्फोट होऊ शकतो. त्यामुळे अतिप्रमाणात चार्जिंग न करण्याचा सल्ला अनेक जण देतात.