फिरते पशुवैद्यकीय चिकित्सालयाची ॲम्ब्युलन्स धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:21 AM2021-07-24T04:21:13+5:302021-07-24T04:21:13+5:30
फिरते पशुचिकित्सालयाचा कार्यभार सहायक पशुधन विकास अधिकारी कुंदन दरवाडे यांच्याकडे देण्यात आला आहे. परंतु त्यांच्याकडे दोन-तीन पशुचिकित्सालयाचा कार्यभार देण्यात ...
फिरते पशुचिकित्सालयाचा कार्यभार सहायक पशुधन विकास अधिकारी कुंदन दरवाडे यांच्याकडे देण्यात आला आहे. परंतु त्यांच्याकडे दोन-तीन पशुचिकित्सालयाचा कार्यभार देण्यात आला आहे. तर पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त मुकुंद कडू हे महिनाभरानंतर निवृत्त होत असल्याने त्यांचे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. या चिकित्सालय अंतर्गत पशुधनाची उपचार सुविधा बंद पडल्याने व फिरते चिकित्सालय वाहनाचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
तालुक्यामध्ये गायी, म्हशी, शेळ्यामेंढ्या आदी जनावरांची संख्या लाखोंच्या संख्येने आहे. पावसाळ्यात जनावरांना विविध रोगांची लागण होते. मागील खरीप हंगामात अनेक जनावरे उपचाराअभावी दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे शासकीय वाहन आहे. मात्र वाहनांमध्ये डिझेल टाकण्यासाठी पैसा, औषधींचा तुटवडा व कर्मचारी नसल्याने वाहन गंज खात पडले आहे. त्यामुळे गावांमध्ये दौरे करून तेथील पशुंवर औषधोपचार बंद आहे. परिणामी अनेक जनावरे दगावत आहेत.
मोहाडी तालुक्यात शेती पाठोपाठ दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा मोठ्या प्रमाणात आहे. सद्यःस्थितीत वाढलेले पशुपालक अन् दुग्धोत्पादनाच्या जोडीला आजार बळावत चाललेत. मात्र त्याच्या प्रमाणात पशू आरोग्यसेवेचा विस्तार होत नसल्याने जनावरांना उपचारासाठी नेणे आवाक्याच्या बाहेर झाल्याने गावांमधून पशू आरोग्य सुविधेचा प्रश्न जटिल बनला आहे. कृत्रिम रेतन, लसीकरण, शस्त्रक्रिया, वंध्यत्व तपासणी, औषधोपचार, लाळ खुरकत प्रतिबंध आदींचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल आहे. पशुधन आजारी पडल्यावर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन जावे लागते. मात्र जनावराला चालता येत नसल्यास वाहन करून उपचारासाठी न्यावे लागते. दवाखाना व दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधेमुळे पशुपालकांच्या दारापर्यंत पशुवैद्यकीय सेवा घेऊन जाण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी ही योजना शेतकऱ्यासाठी फसवी ठरत आहे. शेतकऱ्यांकडे उपलब्ध पशुधनाच्या तुलनेत पशुवैद्यकीय सेवेची सुविधा अत्यल्प आहे. त्यामुळे अनेकदा जनावरे शेळ्या मेंढ्या, मृत होतात. मोहाडी येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याची संख्या मोजकी असल्याने गावात पशुवैद्यकीय सुविधा मिळत नाही. दवाखान्यात औषधीची कमतरता, अधिकाऱ्यांना अतिरिक्त भार, कर्मचाऱ्यांची संख्या मोजकी, फिरत्या वाहनामध्ये डिझेल भरण्यासाठी पुरेशा पैसा नसल्याने वाहन उभे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी डॉक्टरांचा शोध घ्यावा लागत असून फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याला उपचार सुविधा बंद पडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केले जात आहे.