आधुनिकीकरणात बैलांचे गोठे पडले ओस !

By admin | Published: September 11, 2015 01:01 AM2015-09-11T01:01:29+5:302015-09-11T01:01:29+5:30

बैलांवरील प्रेमाचे प्रतीक म्हणून पोळा या सणाचे महत्त्व आहे. या दिवशी बळीराजा आपल्या 'सर्जा-राजा'ची यथोचित पूजा करून कृतज्ञ होण्याचा प्रयत्न करतो; ....

In the modernization of the bulls of the bulls fell dew! | आधुनिकीकरणात बैलांचे गोठे पडले ओस !

आधुनिकीकरणात बैलांचे गोठे पडले ओस !

Next

हिस्से वाटणीमुळे शेतीचा वाटा झाला कमी : चारा टंचाईमुळेही पशुधन पाळणे झाले कठीण
देवानंद नंदेश्वर भंडारा
बैलांवरील प्रेमाचे प्रतीक म्हणून पोळा या सणाचे महत्त्व आहे. या दिवशी बळीराजा आपल्या 'सर्जा-राजा'ची यथोचित पूजा करून कृतज्ञ होण्याचा प्रयत्न करतो; मात्र आताच्या आधुनिक युगात बैलांचे महत्त्व व उपयोगिता कमी होत चालली आहे. परंपरा कायम असली तरी वास्तवात बळीराजाचे वैभव असलेले गोठे ओस पडू लागले आहे. परिणामी करपलेली शेती-हरपलेला बळीराजा, अशी भयावह अवस्था ग्रामीण भागात नजरेस पडत आहे.
शासन दरबारी भंडारा जिल्ह्यात एक लाख ३ हजार ५९७ बैलांची नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र बैलांची संख्या रोडावल्याचे चित्र दिसून येत आहे. बैल हा शेती व्यवस्थेचा कणा आहे. त्याला पोळ्याच्या दिवशी सजवले जाते. सर्जा-राजाच्या जोडीला बळीराजाची घरच्या लक्ष्मीकडून पूजा होते. शेतीच्या मशागतीसाठी जुंपलेली बैलजोडी व त्यांच्यासोबत कष्ट करणारा बळीराजा या सवंगड्यांचं जिवा-भावाचं नातं असतं. सकाळी सकाळी गोठ्यातील बैल सोडून त्यांना सोबत घेऊन शेतशिवारात जाण्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळते; पण आता त्याचे प्रमाण कमी झालेले आहे.
वाढते शहरीकरण व विभक्त कुटुंबपद्धतीसह आधुनिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी होत चालली आहे. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे शेतीचे तुकडे झाल्याने शेतकरी अल्पभूधारक होत आहेत. याचा परिणाम त्यांच्या उत्पन्नात होऊन पशुधन पाळणे अवघड होत आहे. घटलेले शेती क्षेत्र, चाऱ्याचा भेडसावणारा प्रश्न, खाद्याचे वाढणारे दर यामुळेही बैल सांभाळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आधुनिकीकरणाच्या युगात कृषिक्षेत्रातही मोठे बदल घडू लागले आहेत. शेतजमिनीवर बैलांचे पाण्याचा मान असायचा, तो काळ मागे पडला. आता तर शेतीच्या कामात नांगरण, वखरण, पेरणी, फवारणी अशी सर्वच कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जात आहेत. कृषिकार्यात यांत्रिकीकरण आल्याने पारंपरिक औजारांची जागा यंत्राने घेतली. बैलजोडीद्वारे दिवसभर चालणारी कामे काही तासांतच होऊ लागली. यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे सोपी होऊन वेळ व श्रमही कमी झाले. त्यामुळे शेतकरी बैलांच्या ऐवजी ट्रॅक्टर खरेदीला प्राधान्य देत आहेत. या ट्रॅक्टरने इतरांची कामे केल्यास आर्थिक उत्पन्नातही भर पडते. त्यामुळेच ट्रॅक्टरला प्राधान्य दिले जात आहे.
वाढत्या महागाईबरोबर बैलजोडी पाळणे, त्यांची निगा राखणे, दररोज चारा उपलब्ध करणे, खाद्य पुरविणे या बाबी आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने बळीराजाकडे बैल पोसण्याचे प्रमाण कमी-कमी होत चाललेले आहे. काही मंडळी ही उदरनिवार्हासाठी बैलजोडीचा उपयोग म्हणून बैलांना पोसत आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांची वाढत चाललेली संख्या, मशागतीसाठी यंत्राचा वापर, चारा उपलब्धतेत होणारी घट व बैलांचे संगोपण करणे अवघड बनत असल्याने शेतकऱ्यांकडील बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. शासन दरबारी जिल्ह्यात एक लाख ३ हजार ५९७ बैलांची नोंद आहे.

Web Title: In the modernization of the bulls of the bulls fell dew!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.