७० हजारांचा मोहा सडवा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:39 AM2021-05-25T04:39:00+5:302021-05-25T04:39:00+5:30
तिरोडा : अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलीस कंबर कसून बसले असून, वारंवार धाड टाकून अवैध दारू विक्रेत्यांना दणका देत आहेत. ...
तिरोडा : अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलीस कंबर कसून बसले असून, वारंवार धाड टाकून अवैध दारू विक्रेत्यांना दणका देत आहेत. अशातच तालुक्यातील ग्राम पालडोंगरी येथे पोलिसांनी धाड टाकून ६९ हजार ६०० रुपये किमतीचा मोहा सडवा जप्त केला.
तालुक्यातील ग्राम पालडोंगरी येथील नाल्याजवळ हातभट्टीची दारू गळून विक्रीचा व्यवसाय होत असल्याची गोपनीय माहिती तिरोडा पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी नाल्याजवळील परिसरात धाड टाकून तेथून ८७ प्लास्टिक पोत्यांमध्ये प्रत्येकी १० किलोप्रमाणे ६९ हजार ६०० रुपये किमतीचा अवैध सडवा मोहरसायन जप्त केला.
कोरोना संसर्गात दारू दुकाने बंद असल्याने मद्यपींची धाव आता गावठी दारूकडे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दारू गाळून त्याची विक्री केली जात आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू गाळण्याचे प्रमाण वाढले असून, पोलिसांना हा प्रकार माहीत असला तरी कारवाई मात्र केली जात नाही. या प्रकरणात आरोपी अमीन शफी शेख (रा. संत रविदास वॉर्ड) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी ठाणेदार ईश्वर हणवते, पोलीस शिपाई सनोज सपाटे, जोगदाड व अंबुले यांनी केली.