मोहाडीची जागृत देवी ‘माता चौंडेश्वरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2015 01:07 AM2015-10-12T01:07:47+5:302015-10-12T01:07:47+5:30
लाखो भाविकांची श्रद्धास्थान असलेली मोहाडीची जागृतदेवी माता चौंडेश्वरी देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे.
नवरात्रौत्सव : १,३०० ज्योतिकलशाची स्थापना
राजू बांते मोहाडी
लाखो भाविकांची श्रद्धास्थान असलेली मोहाडीची जागृतदेवी माता चौंडेश्वरी देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे.
चौंडेश्वरी मातेच्या मंदिरात मंगलमय वातावरणात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. माता चौंडेश्वरी देवीचे मंदिर आहे. त्याचा ६०० वर्षाचा इतिहास असल्याचे सांगण्यात येते. मंदिराच्या ठिकाणी पूर्वी घनदाट जंगल होते. वृक्षवेलींनी नटलेल्या टेकडीला वेढा घालत जाणारी गायमुख नदी तपोवनात शांत व निसर्गरम्य असा त्या परिसरात श्री संत नारायण स्वामी यांनी मुक्काम केला होता. त्या काळात वाहतूक मार्ग व रस्ते नसल्याने तो परिसर दुर्गम होता. गावात समृद्धी, शांती नांदावी यासाठी महाचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. संत नारायण स्वामींनी मनोमकामना पूर्ण करण्यासाठी यज्ञ केले होते. महायज्ञाच्या आवर्तनासाठी असलेले साहित्य संपले. यज्ञाच्या बाजूला ठेवलेले ऋग्वेद, यजुर्वेद, अर्थवेद व सामवेदाचे एक एक पान हवनकुंडात सोडत असताना महाकाय माँ चौंडेश्वरीचा रुप बाहेर आला. माँ चौंडेश्वरी म्हणाली, ‘आपने जो महाचंडी महायज्ञ हवनकुंड में किया, सच्चे मन से साधना की, चार वेद छोडे, उसकी शक्ती बनकर मैं प्रगट हुई हूं, आप मुझे माँ चौंडेश्वरी कह सकते है. जो भक्त मेरी सच्चे मन से साधना करेगा मैं उसकी मनोकामना पुर्ण करुंगी, मेरा आशीर्वाद आदी अनादिकाल तक रहेगा’ असे म्हणून माता अंतर्मुख झाली अशी आख्यायिका आहे. कालांतराने स्वयंभू प्रगट झालेली माता चौंडेश्वरी या नावाने मोहाडीत मंदिर तयार झाले. माँ चौंडेश्वरी देवी मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अनेक वर्ष माँ चौंडेश्वरी देवीची मूर्ती बाहेरच एका ओट्यावरच्या हवनकुंडात स्थापली होती. श्री संत नारायण स्वामी मातेची देखभाल करीत होते. नारायण स्वामीच्या निधनानंतर त्याचे कुटुंबिय देखभाल करायचे.
दोन दशकापासून देवीच्या मंदिरात यात्रा भरते. दूरवरचे भाविक श्रद्धेने येतात. मंदिरातील आत व बाहेरचे सौंदर्यीकरणाचे काम सुरु आहे. अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. दूरवरून येणाऱ्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय करण्यात आली आहे. नवरात्रभर दूरवरून येणारे भाविक मोठ्या श्रद्धेने महाप्रसादाचे वाटप करतात. नवरात्र उत्सवासाठी दुकाने थाटण्याचे काम सुरु आहे. नवरात्रोत्सवासाठी विनोद पात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली घट देखरेख समिती, स्वागत समिती, निधी संकलन समिती, पूजा समिती, प्रसाद वाटप आदी समित्या तयार करण्यात आल्या आहेत. आजीवन घट ८० तसेच आतापर्यंत ११०० ज्योतीकलशाची नोंदणी करण्यात आली आहे. १३०० च्या वर ज्योतीकलशाची नोंदणी होण्याची शक्यता असल्याचे चौंडेश्वरी ट्रस्टचे संचालक एकानंद समरीत यांनी सांगितले. नवरात्रभर आरती पहाटे ५.१५ व सायंकाळी ६ वाजता वेळेवर केली जाणार आहे. १३ आॅक्टोबर रोजी सकाळी ११.१५ वाजता ज्योतीकलशाचे दीप प्रज्वलन केले जाईल. २२ आॅक्टोबर रोजी सकाळच्या आरतीनंतर घटांचे विसर्जन केले जाणार आहे.