मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर नगरपंचायतीत सत्ता संघर्ष; कोण मारणार बाजी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 11:31 AM2022-02-15T11:31:22+5:302022-02-15T11:40:35+5:30
जिल्ह्यातील मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक १७ फेब्रुवारी रोजी होत आहे. त्यासाठी राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे.
भंडारा : दोन नगरपंचायतीवर भाजपने तर एका नगरपंचायतीत राष्ट्रवादीने बहुमत मिळवूनही नगराध्यक्ष पदासाठी सत्ता संघर्ष सुरू आहे. मोहाडीत तर भाजपचे दोन गट आमने सामने उभे ठाकले आहे. लाखांदूरमध्ये भाजपचे नगरसेवक गळाला लावण्याचा काँग्रेस प्रयत्न करीत आहे. लाखनीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक १७ फेब्रुवारी रोजी होत आहे. त्यासाठी राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. सर्वाधिक रणधुमाळी सुरू आहे ती मोहाडी नगरपंचायतीत. अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी नगराध्यक्षपद राखीव आहे. येथे भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र आता भाजपमध्येच उभे दोन गट पडले आहेत. एका गटाकडे पाच तर दुसऱ्या गटाकडे चार नगरसेवक आहे. भाजपच्या पूनम धकाते आणि छाया डेकाटे यांचे दोन नामांकन आहे. आता भाजपच्या कोणत्या गटाला नगराध्यक्षपदाचा मान मिळतो हे पाहणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
लाखनी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी आठ, काँग्रेस दोन, भाजप सहा आणि अपक्ष एक असे संख्याबळ आहे. नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. राष्ट्रवादीने त्रिवेणी पोहरकर यांचे नामांकन दाखल केले तर भाजपच्या सारिका बसेशंकर यांनीही आपली उमेदवारी दाखल केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची येथे आघाडी होणार हे जवळजवळ स्पष्ट झाल्याने त्रिवेणी पोहरकर नगराध्यक्ष होण्याची शक्यता आहे. तर उपाध्यक्ष पद काँग्रेस मिळणार आहे. आता गुरुवारी नेमके काय होते आणि कुणाच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लाखांदूरमध्ये काँग्रेसचे जोरदार प्रयत्न
लाखांदूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेसचे सहा आणि अपक्ष दोन नगरसेवक विजयी झाले. त्यामुळे भाजपचा नगराध्यक्ष होणार अशी अपेक्षा होती. परंतू काँग्रेसनेही आता येथे नगराध्यक्षपद मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. भाजपचे विनोद ठाकरे व काँग्रेसचे चुन्नीलाल नागमोते यांनी नामांकन दाखल केले आहे. दोन अपक्ष काँग्रेसकडे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आठच्या संख्याबळासह भाजपचा एखादा नगरसेवक गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहे. एखादा भाजप नगरसेवक गळाला लागल्यास काँग्रेस येथे सत्ता स्थापन करू शकते.