तुमसर तालुक्यात परप्रांतातून मोहफुलाची खुलेआम तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:41 AM2019-06-06T00:41:13+5:302019-06-06T00:42:36+5:30
मध्यप्रदेशातून तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोहफुलाची तस्करी केली जात आहे. नदी तीरावरील गावे तस्करीचे मुख्य केंद्र झाले आहेत. आंतरराज्यीय मोहफुल वाहतूकीला बंदी असताना ट्रकच्या माध्यमातून मोहफुलाची खेप येथे पोहचते.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मध्यप्रदेशातून तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोहफुलाची तस्करी केली जात आहे. नदी तीरावरील गावे तस्करीचे मुख्य केंद्र झाले आहेत. आंतरराज्यीय मोहफुल वाहतूकीला बंदी असताना ट्रकच्या माध्यमातून मोहफुलाची खेप येथे पोहचते. उत्पादन शुल्क विभाग व पोलीस यंत्रणा येथे गाफील दिसत आहे.
तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावरुन मध्यप्रदेश राज्याची सिमा सुरु होते. मध्यप्रदेशातील वाराशिवनी, कटंगी, बालाघाट परिसरात मोठ्या प्रमाणात मोहफुलाची झाडे आहेत. मोहफुल अधिकृत विक्रेत्यांची संख्या अगदी कमी आहे. मोहफुलाचा केवळ औषधोपयोगी कामाचा वापर करता येतो. परंतु येथे मोहफुलांची दारु गाळप करण्याकरिता मोहफुलांचा सर्रास उपयोग केला जात आहे. मध्यप्रदेशात कमी किंमतीत मोहफुल खरेदी करुन ते महाराष्टÑाच्या सीमेतील तुमसर तालुक्यात ट्रकमध्ये भरुन आणले जात आहे. वैनगंगा नदी तीरावरील गावात सदर ट्रक एक दिवसाआड येत असून हा प्रकार अनेक महिन्यांपासून सुरु आहे.
बपेरा येथे नाकाडोंगरी मार्गाने मोहफुलाचा ट्रक तुमसर तालुक्यात प्रवेश करीत असल्याची माहिती आहे. तुमसर तालुका व मोहाडी तालुक्याच्या सीमेतील तुमसर-गोंदिया राष्टÑीय महामार्गाजवळील वैनगंगा नदी तीरावरील गावात मोहफुलाचा ट्रक रिकामा केला जात आहे. मोहफुल खरेदी करणारे तेथून मोहफुलाची चिल्लर विक्री करीत आहेत. काहींना मोहफुल दारु गाळप केंद्रापर्यंत मोहफुल पोहचवून देण्यात येत आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यात मोहफुल गाळप केंद्र व दारुची दुकाने गावागावात सुरु आहेत मात्र याकडे कुणाचेही लक्ष नाही.
वाहतुकीला बंदी
केवळ अधिकृत मोहफुल केंद्रावरच मोहफुल विक्री करता येते. त्यामुळे अधिकृत मोहफुल विक्रेत्यांकडेच मोहफुलाचा ट्रक जाऊ शकतो. इतर मोहफुल अनधिकृत खरेदीदारांकडे मोहफुल विक्री करता येत नाही. आंतरराज्यीय मोहफुल वाहतूक व विक्रीला सुध्दा बंदी आहे. परंतु तुमसर तालुक्यात मात्र रोजरोसपणे मोहफुलाचा ट्रक प्रवेश करीत आहे. नेमके हे मोहफुल कुठून येते याचा शोध अजूनपर्यंत संबंधित विभागाने लावला नाही. यातच खरे कारण दडले आहे.
गावठी दारु विक्रीला पोलिसांचा आशीर्वाद
तुमसर व मोहाडी तालुक्यातील बऱ्याच गावात सर्रास गावठी दारुचा व्यवसाय फोफावला आहे. स्वस्त व गावात सहज उपलब्ध होत असल्याने कष्टकरी, मजूरवर्ग मोहफुलापासून तयार होणारी गावठी दारु प्राशन करीत आहे. मोहफुल गाळप केंद्रावर रासायनीक पदार्थांचा उपयोग मोहफुल सडविण्याकरिता केला जातो. हा प्रकार आरोग्यास अपायकारक आहे. मोहफुल दारु विक्रीला निश्चितच पोलिसांचा आशीर्वाद आहे. अर्थकारणामुळे सदर व्यवसाय फोफावण्यास मदत मिळाली आहे.
मंगळवारी एका गावात तीन पोलीस एका दारु विक्री केंद्रावर धाड टाकण्याकरिता गेले होते. त्यांनी एका गृहस्थाला पोलिसी खाक्या दाखवून त्याचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक मागितला. संबंधित पोलीस कशाकरिता आले होते. त्या दारु विक्री करणाºयावर कारवाई केली काय? हे अनुत्तरीत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. सुज्ञ नागरिक हे उघड्या डोळ्यांनी बघतो, परंतु उगाच भानगडीत पडण्यापासून ते दुर राहतात. यामुळे दारू विक्रेत्यांचे चांगलेच फावत आहे. पोलीस या प्रकाराला बगल देत असल्याने दारू विक्रीचा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे.