मोहाडीत तीन घरे आगीत भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 01:09 AM2019-05-08T01:09:16+5:302019-05-08T01:09:34+5:30
येथील सुभाष वॉर्डात तीन घरांना लागलेल्या आगीत जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारला दुपारच्या सुमारास घडली. आगीत तीन घरांपैकी दोन घरे पूर्णपणे जळालेली आहे तर एका घरातील एक भाग जळालेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाड़ी : येथील सुभाष वॉर्डात तीन घरांना लागलेल्या आगीत जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारला दुपारच्या सुमारास घडली. आगीत तीन घरांपैकी दोन घरे पूर्णपणे जळालेली आहे तर एका घरातील एक भाग जळालेला आहे.
सुभाष वॉर्डातील शेवटच्या टोकावर असलेले देवराम शेंडे, सुखदेव शेंडे व रामप्रसाद शेंडे यांच्या घराला लागून असलेल्या शेतीच्या धुऱ्यावरील गवत जाळण्यासाठी कोणीतरी आग लावली.
हवेमुळे ती आग या घराला लागली, असा अंदाज आहे, परिसरातील आकाश पिकलमुंडे, बादल सोनवाने, जितु सोनवाने, गुरुदेव बांते यांनी घराला लागलेली आग आटोक्यात आणण्याचे विशेष प्रयत्न केले.
तसेच चेतन गोपीचंद शेंडे या युवकाने जिवाची पर्वा न करता घरात असलेले गॅस सिलेंडर बाहेर काढले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून नष्ट झाले, आग लागल्याची सूचना प्राप्त होताच ठाणेदार शिवाजी कदम पोलीस कर्मचारी विनोद सेलोकर, पवन राऊत, मिथुन चांदेवार, आशीष तिवारी, ज्ञानेश्वर हाके, संजय बडवाईक, संजय वाकलकर, राजेश गजभिये यांनी घटनास्थळावर धाव घेवून मदत कार्यात सहभाग घेतला, तुमसर नगर परिषदेची अग्निशमन बंब येत पर्यंत वॉर्डातील युवकांनी आग आटोक्यात आणली होती.
यात आशिष पात्रे यांच्या पाण्याच्या टँकरने वेळीच घटनास्थळावर पोहोचून फार मोठी कामगिरी बजावली. या घटनेत देवांगणा सुखदेव शेंडे यांनी पेटीत ठेवलेले चार हजार रुपये तसेच मंगळसूत्र व दोन नथ वितळून नष्ट झाल्या तर कविता देवराम शेंडे यांनी पेटीत ठेवलेले आठ हजार रुपये नगदी व त्यांच्या सासूचे आठ हजार रुपये जळून नष्ट झाले, याशिवाय घरातील संपूर्ण साहित्य ची राखरांगोळी झाली.
घरातील अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तु, कपडे, इतर साहित्य जळून खाक झाले असल्याने त्यांच्यावर मोठेच संकट कोसळलेले आहे. शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आहे.