आरोग्यासाठी मोहफुलाचे सरबत उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 11:17 PM2017-09-08T23:17:38+5:302017-09-08T23:18:02+5:30
विदर्भात मोहफुलाचे सर्वात जास्त उत्पादन होते. मोहफुलामध्ये अनेक औषधीयुक्त तत्व असून ती मानवी आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विदर्भात मोहफुलाचे सर्वात जास्त उत्पादन होते. मोहफुलामध्ये अनेक औषधीयुक्त तत्व असून ती मानवी आरोग्यासाठी उपयुक्त आहे. मोहफुलापासून बनलेले सरबत आरोग्यवर्धक ठरणार आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. मोहा क्लस्टरच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोहफुलाचे कल्पवृक्ष लावून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी आ.रामचंद्र अवसरे होते. पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सुनिल मेंढे, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, जिल्हा उद्योग केंद्राचे महाप्रबंधक मदन खडसे, प्राचार्य सचिन लोहे, उपमहाप्रबंधक सिध्दार्थ ढोके, राष्ट्रवादीचे धनंजय दलाल, सदानंद इलमे, सविता ब्राम्हणकर डॉ.चंद्रशेखर राऊत उपस्थित होते.
यावेळी खा. पटोले म्हणाले, भंडारा जिल्हा हा मोहफुलासाठी प्रसिध्द जिल्हा आहे. मोहापासून कित्येक वस्तू बनतात. औषधी गुणधर्म असलेला मोहफुल म्हणून ओळखला जातो. भंडारा मोहफूल क्लस्टरने जो पुढाकार घेतला तो जिल्ह्यातील समस्त बांधवांसाठी रोजगार मिळवून स्वदेशी अपनाओ हा नारा दिला आहे. व्यसनमुक्त भारत निर्माण करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घेऊन हे सरबत वापरल्यास शरीर सुदृढ बनविता येईल. मोहफुलावरची बंदी उठविण्याकरीता आवाज बुलंद केला होता. देशात व जिल्ह्यात चिन्ही वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. चिनी वस्तू वापरणे बंद केले पाहिजे व स्वदेशी वस्तूंचा वापर करणे ही एक गरज म्हणून वापर करावी. मोहफुलापासून जीनापयोगी वस्तू तयार केले जातात.
भंडारा जिल्ह्यात अनेक वने आहेत. मोहाचे उत्पादन आपल्या विदर्भात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतू आजपर्यंत याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून आले. त्याकरीता आरोग्यासाठी मोहफुलाचे सरबत लाभदायक आहे असे सांगितले. मोहफुल म्हणजे निसर्गनिर्मित जंगली मेवा आहे. पण कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने बालकांचे कुपोषण वाढले आहे. आमचा उद्देश नफा कमाविण्याचा नसून जंगलव्याप्त भागात राहणाºया लोकांना बेरोजगारांना मुख्य प्रवाहात आणणे या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करुन देणे हा आहे.
प्रास्ताविकात डॉ.संजय एकापुरे म्हणाले, भंडारा जिल्ह्यातील कल्पवृक्ष दारुच्या नावाने बदनाम केला गेला. मोहफुलाच्या या महारोपट्याला महाराष्ट्रातून संपविण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते. मोहफुल हे झाड आरोग्यवर्धक व रोजगार निर्मिती करणारे आहे. त्यातून कित्येक बेरोजगारांना रोजगार मिळवू शकतो त्याकरीता त्या वृक्षाचे संरक्षण करणे काळाची गरज बनली आहे, असे सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन देवेंद्र गावंडे यांनी तर आभारप्रदर्शन उमेश मोहतुरे यांनी केले.