मध्यप्रदेशातून मोहफुलांची विदर्भात आयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 09:48 PM2019-01-02T21:48:08+5:302019-01-02T21:49:00+5:30
विदर्भाच्या सीमावर्ती भागात मध्यप्रदेशातून मोहफुलाची खुलेआम आयात होत असून गत डिसेंबर महिन्यात मोठी खेप आल्याची धक्कादायक माहिती आहे. या मोहफुलापासून हातभट्टीची दारु तयार केली जात असून तुमसर तालुक्यात अनेक गावात दारु गाळण्याचे कारखाने आहेत. हा सर्व प्रकार खुलेआम सुरु असतांना कारवाई मात्र केली जात नाही.
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : विदर्भाच्या सीमावर्ती भागात मध्यप्रदेशातून मोहफुलाची खुलेआम आयात होत असून गत डिसेंबर महिन्यात मोठी खेप आल्याची धक्कादायक माहिती आहे. या मोहफुलापासून हातभट्टीची दारु तयार केली जात असून तुमसर तालुक्यात अनेक गावात दारु गाळण्याचे कारखाने आहेत. हा सर्व प्रकार खुलेआम सुरु असतांना कारवाई मात्र केली जात नाही.
पुर्व विदर्भातील तुमसर तालुका हा महाराष्ट्राचे शेवटचे टोक आहे. सातपुडा पर्वत रांगांच्या पलीकडे मध्यप्रदेश आहे. मध्यप्रदेशच्या सीमावर्ती बालाघाट, वाराशिवनी, कटंगी जंगलात मोठ्या प्रमाणात मोहाची झाडे आहेत. मोहफुलाची खेप नियमित भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात पोहचविली जाते. तुमसर तालुक्यात दोन ठिकाणी सीमा लागून आहे. नाकाडोंगरी आणि बपेरा येथील महाराष्ट्राच्या सीमेतून सहज प्रवेश करता येतो. चारचाकी वाहनातून मोहफुलाची खेप याच मार्गाने आणली जाते. सोंड्या पुलावरुन चिखली, देवनारा, अंजनविहिर, सीतेकसा मार्गाने मोहफुल तुमसर तालुक्यात येत आहे.
डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात नववर्षाच्या स्वागतासाठी मोहफुलाची दारु मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली. ग्रामीण भागात ठिकठिकाणी ही दारु सहज उपलब्ध होती. तुमसर शहरातून तीन किमी अंतरावरील गावात मोहफुल दारुचे मोठे केंद्र आहे. तालुक्यात मोहफुलाची दारु सर्वत्र उपलब्ध आहे. आलेसूर, पिटेसूर सह बावनथडी धरणाच्या वितरीका परिसरात दारु गाळली जाते. ग्रामीण परिसरातही मोठ्या प्रमाणात दारु गाळण्याचे कारखाने आहेत.
मोहफुल आयात करणारी मोठी आंतरराज्यीय यंत्रणा कार्यरत आहेत. मोहफुल व्यवसाय फायद्याची असून मद्यनिर्मितीत मोठा आर्थिक फायदा असल्याचे सांगितले जाते. मध्यमवर्गीय व गरीब मजूर, कामगारांची मोहफुलाच्या दारुला पहिली पसंती असते. स्वस्तात तयार होणारी ही दारु सर्वत्र उपलब्ध असते.
मोहफुलाची दारु धोकादायक
मोहफुलापासून निर्मित दारुला ग्रामीण भागात हातभट्टीची दारु म्हणून ओळखले जाते. ही दारु तयार करण्यासाठी मोहाचा सडवा तयार केला जातो. त्यात अशुध्द गुळ आणि नवसागर मिसळून उर्ध्वपतन पध्दतीने दारु गाळली जाते. मात्र ही दारु अतिकडक करण्यासाठी त्यात विविध रसायनांचा वापर केला जातो. नवसागर, युरिया सारखी घातक पदार्थ टाकले जातात. त्यासोबतच अनेकदा विषारी द्रावणही टाकूनही दारु कडक केली जाते. पोलीस अशा हातभट्ट्यांवर कारवाई करतात. परंतु आयात होणाऱ्या मोहफुलाकडे मात्र दुर्लक्ष करतात.