मॉयलमधील ब्लास्टिंगच्या कंपनामुळे घरांना भेगा
By Admin | Published: January 22, 2017 12:37 AM2017-01-22T00:37:13+5:302017-01-22T00:37:13+5:30
तालुक्यातील डोंगरी (बु.) येथे 'मॅग्नीज ओर' ची ओपनकास्ट खाण आहे. या खाणीतून मॅग्नीज बाहेर काढण्याकरिता मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग सुरु आहे.
बाळापूरतील प्रकार : भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनची पत्रपरिषद
तुमसर : तालुक्यातील डोंगरी (बु.) येथे 'मॅग्नीज ओर' ची ओपनकास्ट खाण आहे. या खाणीतून मॅग्नीज बाहेर काढण्याकरिता मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग सुरु आहे. त्यामुळे मोठे हादरे बसत असून घर, शाळा, मंदिरांना भेगा पडल्या आहेत. अनेक घरे कोलमडून पडले आहेत. मात्र मॉयल प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे गावकऱ्यांसह अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार जनआंदोलन समिती तर्फे भव्य मोर्चा व आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
मॉयल डोंगरी (बु.) ने अनाधिकृतरित्या गावठान, काबिलकास्त, आम रस्ता, स्मशान भूमीवर देखील कब्जा केला आहे. तिथे अवैधरित्या मॅग्नीजचे अवैध उत्खनन सुरुच आहे. मॉयल लगतच या बाळापूर येथील गट नं. ९५, ९६, ९७ या जमिनीवर केवळ साडे चार एकरची लिज मॉयलला मिळाली असताना त्यांनी ७५ एकरवर कब्जा केला आहे. नियमानुसार ५०० मिटर दूर जर वसाहत किंवा गाव असेल तर तिथे ब्लास्टींग होवू शकत नाही. मात्र मॉयल प्रशासन हव्यासापोटी १५० ते २०० मिटरवर वसलेल्या बाळापूर गावाजवळच ब्लास्टींग करीत असल्यामुळे हादराने अनेक घरांना भेगा पडल्यात, तर अनेक घरे कोसळलेही आहेत. त्याच बरोबर ब्लास्टींगमुळे दगड उडत असल्याने अनेक जण गंभीर जखमी झाल्याचीही घटना घडली आहे. मात्र मॉयल प्रशासन गंभीर नाही. जवळपास २७५ एकर समितीवर मॉयलने अवैध कब्जा करून कोट्यवधी रुपयांची काळाबाजारी सुरु असल्याने ते गब्बर झाले आहेत. कुंभकर्णी झोपेचा सोंग घेतलेल्या मॉयल प्रशासनाला जागे करण्याकरिता व गावकऱ्यांना न्याय देण्याकरिता गावकरी तसेच अण्णा हजारे प्रणित समितीच्या वतीने तात्काळ समस्या सोडवा अन्यथा भव्य आंदोलन व आमरण उपोषणाचा इशाराही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेत यावेळी भ्रष्टाचार जण आंदोलन समितीचे शंकरदादा बडवाईक, बाळापूरचे धर्मेंद्र धकेता, ओम लांजेवार, शिशुपाल दहाट सह अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)