धावत्या बसमधील अत्याचाराचे प्रकरण : अल्पवयीन विद्यार्थिनीवर जंगलातही केला अतिप्रसंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2022 13:58 IST2022-04-15T13:56:25+5:302022-04-15T13:58:19+5:30
मंगळवारी रात्री साकोली ते नागपूर प्रवासादरम्यान अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचे उघड झाल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

धावत्या बसमधील अत्याचाराचे प्रकरण : अल्पवयीन विद्यार्थिनीवर जंगलातही केला अतिप्रसंग
साकोली (भंडारा) : धावत्या एसटी बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाने यापूर्वी तिच्यावर जंगलातही अतिप्रसंग केल्याची माहिती बुधवारी रात्री पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर पोलीस तपासात पुढे आली. मंगळवारी रात्री साकोली ते नागपूर प्रवासादरम्यान अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचे उघड झाल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
साकोली तालुक्यातील बोधरा येथील राजेश ईश्वर मडावी (१९) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याने १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला नागपूरला फिरायला जाण्याचे आमिष देऊन धावत्या बसमध्ये तिच्यावर अत्याचार केला हाेता. पोलिसांनी वडिलांच्या तक्रारीवरून राजेशला ताब्यात घेतले. दोघांची वैद्यकीय तपासणी करून राजेशला गुरुवारी रात्री अटक केली. चौकशीत खळबळजनक माहिती पोलिसांना मिळाली. राजेशने तिच्यावर यापूर्वी साकोली तालुक्यातील एका जंगलात नेऊन अतिप्रसंग केल्याचे पुढे आले. घटनेचा तपास साकोलीचे ठाणेदार जितेंद्र बोरकर करीत आहेत.
रात्री बसमध्ये लाईट सुरू ठेवणार
ही घटना उघडकीस आल्यानंतर रात्री बसमधील सर्व लाईट सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसेच दर १० ते १५ किमी.वर बस शेवटपर्यंत तपासण्यात येईल. काही संशयास्पद वाटल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क करावा, अशा सूचना आगारातील सर्व चालक व वाहकांना देण्यात आलेल्या आहेत.
- गौतम शेंडे, आगार व्यवस्थापक, साकोली.