घरकुलाचे बिल काढण्यासाठी घेतले पैसे
By admin | Published: October 21, 2016 12:44 AM2016-10-21T00:44:27+5:302016-10-21T00:44:27+5:30
तुमसर पंचायत समिती अंतर्गत आलेसुर येथे घरकुलाचे बिल काढण्याकरीता व मस्टर काढण्यासाठी रोजगार सेवक राहुल करमकर यांनी पैसे घेतल्याचा आरोप आहे.
चौकशीत दोषी : रोजगार सेवकाची तक्रार
भंडारा : तुमसर पंचायत समिती अंतर्गत आलेसुर येथे घरकुलाचे बिल काढण्याकरीता व मस्टर काढण्यासाठी रोजगार सेवक राहुल करमकर यांनी पैसे घेतल्याचा आरोप आहे. तसेच त्यांच्या विरूद्ध खंडविकास अधिकारी यांनी नोंदविलेल्या बयानातही ही बाब स्पष्ट झाली आहे. परिणामी सदर रोजगार सेवकाला काढण्यासाठी २४ आॅक्टोबरला विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे.
आलेसुर येथील रोजगार सेवक राहुल करमकर यांनी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिटेसूर या गावातील १३ घरकुल मंजूर लाभार्थ्यांकडून घरकुलाचे बिल व मस्टर काढण्याकरीता पैसे घेतले, असा आरोप आहे. यासंदर्भात तुमसरचे खंडविकास अधिकारी यांच्या समक्ष १३ लाभार्थ्यांनी लेखी बयान दिले आहे. चौकशीनुसार रोजगार सेवक पदावरून कमी करण्यात यावे, असा ठरावही पारित करून बिडीओंना पाठविण्यात आला आहे. ग्रामसभेत चौकशी अहवालावर चर्चा करण्यात येवून निर्णय घेण्यात येणार आहे.
ग्रामसभेत लावलेले आरोप धादांत खोटे असून बिनबुडाचे आहे. माझ्या विरूद्ध राजकीय दबावातुन एकतर्फी चौकशी करण्यात आली आहे. मला बोलण्याची संधी देण्यात आली नाही. शासकीय नियमाप्रमाणे घरकुलाचे मस्टर काढून लाभार्थ्यांना पैसे काढून दिले आहे.
-राहुल करमकर, रोजगार सेवक आलेसुर.