मान्सून रूसला, पेरण्या खोळंबल्या
By admin | Published: June 24, 2017 12:25 AM2017-06-24T00:25:54+5:302017-06-24T00:25:54+5:30
लहरी निसर्गामुळे शेती बेभरोवशाची व तोट्याची झाली आहे. मान्सूनवरच शेती हंगाम अवलंबून असल्याने शेतकरी दररोजच चातकाप्रमाणे पावसाची वाट बघत आहे.
आद्रा नक्षत्रास आरंभ : पेरणीकरिता तयारी पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : लहरी निसर्गामुळे शेती बेभरोवशाची व तोट्याची झाली आहे. मान्सूनवरच शेती हंगाम अवलंबून असल्याने शेतकरी दररोजच चातकाप्रमाणे पावसाची वाट बघत आहे. मात्र मान्सून वाऱ्यांचा वेग मंदावल्याने आणखी किती दिवस मान्सून सक्रिय व्हायला वेळ लागेल हे अनिश्चित असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
मागील पाच-दहा वर्षापासून निश्चितच वेळेत मान्सून हजेरी लावतच नाही. हवामान खातेही दररोज नव्या नव्या अभ्यासाच्या आधारे नवेनवे शोध घेतो तरी मात्र हवामान खाते नापास होत आहे. यामुळे शेतकरी सावध पवित्रा घेत पावसाची वास्तवास्थिती बघूनच पेरणीचा निर्णय घेत आहे. आजपर्यंत केवळ पाच ते दहा टक्केच पेरणी आटोपली असून स्वतंत्र सिंचन व्यवस्थेतच पेरणी आटोपली आहे.
मान्सूनची गती वाढल्यास पेरणीला गती येईल अन्यथा पेरण्या थांबलेल्याच आहेत. शेतकरीही वर्तमानपत्र, दूरदर्शनच्या आधाराने माहिती घेत खरीपाची शेती कसताना दिसत आहे.
पुढच्या हप्त्यापासून मान्सून सक्रीय होणार असल्याचे भाकित वर्तवले जात आहे. मान्सून रूसल्याने उष्णता कायम असून पारा ४२ ते ४५ अंशाच्या घरात खेळत आहे.
पाऊसच नसल्याने जमिन तहानली आहे. जमिनीला भेगा मोठ्या असल्याने पेरणी शक्य नाही. जमिनीतील तणसुद्धा उगवला नसल्याने पेरणी केलीच नाही.
-दुधराम पराते, धान उत्पादक शेतकरी पालांदूर.
नर्सरी तयार झाली आहे. परंतु पाऊस अपेक्षित नसल्याने महागाचे बियाणे वाया जाऊ देण्यापेक्षा अपेक्षित पाऊस आल्यावरच पेरणी करायची आहे. कृषिमंडळ कार्यालयातूनही सुचना मिळाल्याने पेरणी थांबली आहे.
-कृष्णा जांभुळकर, प्रगत शेतकरी पालांदूर.