ग्रामीण भागात जंगलातील रानभाज्यांना आला बहर; औषधी गुणधर्मामुळे शहरांमध्येही मोठी मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2022 05:24 PM2022-07-04T17:24:30+5:302022-07-04T17:35:36+5:30
रानभाज्यांना ग्रामीण भागासह शहरांमध्येही मोठी मागणी आहे. पावसाळा सुरू होताच रानभाज्या येण्याचे प्रमाणही वाढले आहे.
किटाडी (भंडारा) : पावसाळा सुरू झाला आहे. हिरवाईने बहरलेल्या ग्रामीण भागातील जंगलातील विविध आरोग्यदायी, पौष्टिक, औषधीयुक्त, गुणकारी, चविष्ट रानभाज्यांना बहर आला आहे. सध्या जंगलातील वृक्षवेलींना नवीन पालवी फुटत आहे. या नवीन पालवीसोबतच रानभाज्यांचा हंगामही सुरू झाला आहे. रानभाज्यांमध्ये प्रामुख्याने कुड्याच्या फुलांचा समावेश असतो.
लाखनी तालुक्यातील किटाडी येथील जंगल शिवारात पावसाळ्यात हिरव्यागार, कोवळ्या, लुसलुशीत पालवीमध्ये हरदपरीची भाजी व कुड्याच्या झाडांना उमलणारी पांढरी शुभ्र फुले लक्ष वेधून घेत आहेत. नैसर्गिक बहुगुणी असलेल्या कुड्याच्या फुलांची चव थोडी कडवट व तुरट असली तरीही मानवी आरोग्यासाठी बहुउपयोगी असून फायदेशीर आहे. सध्या स्वयंपाकघरातून रानभाज्यांचा सुगंध दरवळत आहे.
निसर्गात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यास मदत होते. आजच्या यांत्रिक युगात विविध रासायनिक खतांचा वापर करून शेतात हिरव्या भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, रानभाजी जंगलात नैसर्गिकरित्या आपोआप उपलब्ध होत असल्याने रासायनिक खतांचा त्यात लवलेशही नसतो. रानभाज्यांना ग्रामीण भागासह शहरांमध्येही मोठी मागणी आहे. पावसाळा सुरू होताच रानभाज्या येण्याचे प्रमाणही वाढले आहे.
सुकवून ठेवली जातात कुड्याची फुले
ग्रामीण भागात रानभाज्यांचा हंगाम सुरू झाला की महिला वर्ग घोळक्याने जंगलात कुड्याची फुले तोडण्यासाठी जातात. पांढरी शुभ्र दिसणारी कुड्याची फुले कष्टाने तोडून घरी आणली जातात. त्यानंतर कुड्याची फुले व कळ्या व्यवस्थित खुडून साफ केली जातात व त्यांना परड्यावर किंवा कापडावर पसरवून उन्हात सुकविली जातात. आवडी-निवडीनुसार आवश्यकता वाटल्यास सुकविलेल्या कुड्याच्या फुलांची भाजी बनवितात.
बांधांवरील रानभाज्या गायब
पूर्वी पावसाळ्यात बांधात व धुऱ्यावर अनेक प्रकारच्या हिरव्यागार भाज्या उगवत होत्या. मात्र, अलीकडे शेतात किंवा धुऱ्यावर केरकचरा वाढू नये, यासाठी रासायनिक तणनाशक औषधींची फवारणी करतात. परिणामी, आहारातील हिरव्या भाज्या उगविण्याच्या अगोदरच नष्ट होत आहेत.