धनादेश क्लिअरन्ससाठी लागतो महिना
By admin | Published: January 21, 2017 12:33 AM2017-01-21T00:33:30+5:302017-01-21T00:33:30+5:30
स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा मोहाडीच्या कर्मचाऱ्यांच्या अरेरावीने खातेधारक त्रस्त आहेत.
मोहाडीत बँक खातेदारांमध्ये संताप : शेतकऱ्यांसमोर पेच, कॅशलेशला हरताळ
मोहाडी : स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा मोहाडीच्या कर्मचाऱ्यांच्या अरेरावीने खातेधारक त्रस्त आहेत. या बँकेत जमा करण्यात आलेल्या धनादेशाला क्लिअरन्ससाठी एक महिन्याचा अवधी लागतो. धनादेश क्लिअर होत नसल्याने धानाचे चुकारे असलेले धनादेश प्राप्त होऊनही शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅशलेश व्यवहाराला बँकेतर्फे हरताळ फासल्या जात असल्याचा आरोप आता खातेदारांकडून होत आहे.
मोहगाव देवी येथील शेतकरी चंद्रशेखर साखरवाडे यांनी धान विकला. त्यांना ६ हजार ८०० रूपयांचा धनादेश व्यापाऱ्याकडून प्राप्त झाला. त्यांचे खाते स्टेट बँक मोहाडी येथे असल्याने त्यांनी तो धनादेश क्रमांक ०१५१८४ स्टेट बँक मोहाडी येथे २७ डिसेंबर २०१७ रोजी जमा केला. खात्यावर रूपये जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी ते तीन चार वेळा बँकेत गेले. मात्र त्यांची रक्कम आजपर्यंत जमा झालेली नाही. याबाबत त्यांनी बँकेच्या व्यवस्थापक श्वेता साळवे यांना विचारणा केली असता त्यांनी धनादेश काऊंटर लिपीक निता घोडपाणे यांना भेटायला सांगितले. मात्र, धनादेशाच्या रक्कमेची माहिती दिली नाही. धनादेश लिपीकांनी तर त्यांना सरळ २५ दिवसानंतरच यावे तोपर्यंत बँकेतून येवू नये असे धमकावून सांगितले. धनादेश जमा करून आज २५ दिवस लोटले असले तरी धनादेशाची रक्कम जमा झालेली नाही. बँक कर्मचारी अरेरावीने व चढ्या आवाजात असमाधानकारक उत्तरे देतात ज्यामुळे ग्राहकांचा तिडपापड होत आहे.
ग्राहकांना या वर्तनुकीमुळे शारीरिक व आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. साखरवाडे यांनी जिल्हाधिकारी, आमदार चरण वाघमारे, तहसीलदार मोहाडी, ठाणेदार मोहाडी यांचेकडे तक्रार केली आहे.
कॅशलेश व्यवहार करून आपल्याच पायावर धोंडा मारून घ्यावा असा प्रश्न केला असून बँकेच्या कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
धनादेशाचे नागपूर कार्यालयातून क्लिअरन्स होतात. आमच्या शाखेतून होत नाही. सध्या धनादेशांची संख्या वाढलेली असल्याने थोडा उशीर होत आहे. काही दिवसातच ही समस्या सुटेल.
-श्वेता साळवे, व्यवस्थापक, स्टेट बँक आॅफ इंडिया, मोहाडी.