स्वच्छता मॅरेथॉनसाठी वाजला डिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 10:01 PM2017-12-27T22:01:26+5:302017-12-27T22:02:14+5:30
येथील मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर देशाचे सीमेवर शहीद झाले. लष्करी इतमामात झालेल्या अंत्यसंस्काराला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पवनी नगरावर शोककळा पसरली होती.
आॅनलाईन लोकमत
पवनी : येथील मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर देशाचे सीमेवर शहीद झाले. लष्करी इतमामात झालेल्या अंत्यसंस्काराला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पवनी नगरावर शोककळा पसरली होती. दोन दिवस शोकसागरात बुडालेल्या नगर पालिका प्रशासनाने २६ डिसेंबरला स्वच्छता मॅराथॉन दौड आयोजित करून गावात डीजे वाजविला. अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी डिजेच्या तालावर ठेका धरला, या घटनेचा बसपाने निषेध केला आहे.
तहसीलदारांमार्फत दिलेल्या निवेदनानुसार, २६ ला सकाळी पालिका प्रशासनाने स्वच्छता मॅराथॉन दौड आयोजित केली. आ.अॅड.रामचंद्र अवसरे यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅराथॉन दौडचा शुभारंभ केला. यावेळी नगराध्यक्ष पुनम काटेखाये, उपाध्यक्ष कमलाकर रायपुरकर, मुख्याधिकारी माधुरी मडावी, नगरविकास आघाडीचे अध्यक्ष विलास काटेखाये, पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते. मॅराथॉन दौड सुरु झाल्यानंतर नागरिक व नगरपालिका विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले. मॅराथॉन दौडमध्ये डिजेची गरज नसताना रॅलीसोबत नगरात डीजे वाजविण्यात आला. बारा तासापूर्वी ज्यांनी श्रद्धांजली वाहून शहीद मेजर प्रफुल्ल यांचे स्मरणार्थ स्मारक निर्मितीचा संकल्प केला त्यातीलच अधिकारी, पदाधिकारी गावात डिजेच्या तालावर थिरकले. ही बाब नगरवासीयांना संतप्त करणारी होती. स्वच्छता मॅराथॉन दौडचा उद्देश स्वच्छतेची जनजागृती असला तरी डिजेवर थिरकणे हे अशोभनीय असल्याचे म्हटले आहे.
निवेदन देताना जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश नंदुरकर, राजू गणवीर, जय मेश्राम, अरविंद धारगावे, रमेश मोटघरे, माला समुद्रेकर, सीमा कोचे यांच्यासह बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहीद मेजर प्रफुल मोहरकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी नगर पालिकेने पुढाकार घेऊन घाटाची स्वच्छता केली. दोन एकरात स्मारक तयार करण्याचा पालिकेने संकल्प केला असून तिथे ई-लायब्ररीपासून सर्व सुविधा देण्याचा पालिकेचा मानस आहे. संपूर्ण देशात स्वच्छता सर्वेक्षण सुरू आहे. ३१ डिसेंबरपर्यंत हा कार्यक्रम जनजागृतीच्या माध्यमातून राबविण्याचे आदेश आहेत. दु:खद प्रसंगामुळे हा कार्यक्रम चार दिवस पुढे ढकलण्यात येऊन आता राबविण्यात आला. यात चुकीचे काय केले.
-माधुरी मडावी,
मुख्याधिकारी पवनी.