रेल्वेच्या बोगीतून दुडुदुडु धावत पुढे दीड वर्षांचा चिमुकला, मागे आई अन्...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 03:56 PM2022-01-03T15:56:45+5:302022-01-04T10:28:33+5:30
रेल्वे डब्यातील प्रसाधनगृहाकडे जाताना चिमुकला अथर्व धावत पुढे गेला, त्याची आई त्याच्यामागे गेली. इतक्यात काही कळायच्या आत अथर्व रेल्वेखाली पडला मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचाही तोल जावून रेल्वेखाली पडल्याने मृत्यू झाला.
करडी (भंडारा) : आईच्या पुढे दुडूदुडू धावत जात असताना डाेळ्यादेखत चिमुकला मुलगा रेल्वेतून पडला. दुसऱ्याच क्षणी त्याला वाचविण्यासाठी धावलेल्या आईचाही रेल्वेखाली पडल्याने मृत्यू झाला. ही घटना देव्हाडा - माडगी वैनगंगा नदी पुलावर घडली असून साेमवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. पूजा इशान रामटेके (वय २७) व अथर्व इशान रामटेके (१८ महिने, रा. टेकानाका, नागपूर) असे मृत माय-लेकाचे नाव आहे.
मध्यप्रदेशातील रिवा येथील सैनिकी शाळेत रसायनशास्त्राचे प्राध्यापक असलेले इशान रामटेके (रा. टेकानाका, नागपूर) हे सुटी संपल्याने कुटुंबासह नागपूर रेल्वेस्थानकाहून रेवा येथे जाण्यासाठी रात्रीच्या रेल्वेने निघाले होते. तुमसर रेल्वे स्थानकावरून गाडी पुढील प्रवासात असताना पत्नीला लघुशंका लागल्याने पतीला सांगून ती दीड वर्षाच्या मुलासह रेल्वे डब्यातील शौचालयाकडे गेली. त्यावेळी मुलगा धावत-धावत समोर गेला. काही कळण्याच्या आतच माडगी व देव्हाडा दरम्यान वैनगंगा नदी रेल्वे पुलावरून नदीत पडला.
मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात महिलेचा तोल जाऊन तीसुद्धा रेल्वे पुलाहून कोसळली. या घटनेत दीड वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर महिलेला पुलाचा मार लागून लटकलेल्या स्थितीत ठार झाली. ही घटना रात्रीच्या दरम्यान घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
शाेधाशाेध केली अन् मृतदेहच गवसले
बराच वेळ झाल्यानंतरही पत्नी व मुलगा परत न आल्याने पतीने धावत्या रेल्वेत शोधाशोध केली. परंतु शोध न लागल्याने त्याने गोंदिया येथे पत्नी व मुलगा हरवल्याची तक्रार नोंदविली. सोमवारी रेल्वे कर्मचारी पेट्रोलिंगवर असतांना दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांना एका महिलेचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत तर मुलाचा मृतदेह नदीत आढळून आला.
घटनेची माहिती रेल्वे पोलीस व करडी पोलिसांना होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. इशान रामटेके यांनी दोन्ही मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तुमसर येथे पाठविण्यात आले. तपास करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नीलेश वाजे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.