बसस्थानकांवर ‘हिरकणीं’च्या वापराकडे मातांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:54 AM2021-01-08T05:54:55+5:302021-01-08T05:54:55+5:30
भंडारा : जिल्ह्याच्या मुख्यालयी असलेल्या भंडारा बसस्थानकांमध्ये बाळाला दूध पाजताना कुचंबणा होऊ नये म्हणून काही वर्षांपूर्वी ...
भंडारा : जिल्ह्याच्या मुख्यालयी असलेल्या भंडारा बसस्थानकांमध्ये बाळाला दूध पाजताना कुचंबणा होऊ नये म्हणून काही वर्षांपूर्वी ‘हिरकणी कक्ष’ स्थापन करण्यात आले. मात्र, या हिरकणी कक्षाकडे मातांची पाठ असल्याचेच दिसून येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कोरोना संसर्ग ठरत आहे.
मार्च महिन्यात लाॅकडाऊन झाल्यानंतर बससेवाही बंद झाली होती. त्यानंतर राज्य शासनाने निर्णय घेत बसेस सुरू केल्या. याचवेळी बसस्थानकातील हालचाली हळूहळू वाढू लागल्या. प्रवाशांची संख्याही वाढली. सद्य:स्थितीत या बसस्थानकातील हिरकणी कक्ष सुव्यवस्थित असल्याचे दिसून आले. ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेक अंतर्गत या कक्षात बसून महिला कर्मचारी भोजनही करतात. दररोज या कक्षाची नियमितपणे स्वच्छता केली जाते. मात्र, पूर्वीप्रमाणे या कक्षात माता येऊन बाळांना दूध पाजण्याचे धाडस कोरोना संकटकाळामुळे दाखवित नसल्याचेही दिसून येते. या संदर्भात येथील वाहतूक अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, त्यांनीही हीच बाब सांगितली. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळेच या कक्षाचा वापर कमी झाल्याचे निरीक्षणाअंती दिसून आले.
हिरकणी कक्ष तयार करण्यामागील हेतू
आईच्या दुधाचे महत्त्व अनेकदा आपण ऐकत व वाचत असतो. बसस्थानकात असलेल्या हिरकणी कक्षाच्या माध्यमातून प्रवासात स्तनदा मातेला दूध पाजणं सुलभ व्हावे यासाठी हिरकणी कक्ष तयार करण्यात आले. राज्यातील बस व रेल्वे स्थानकावरही अशी सोय करण्यात आली आहे. विशेषत: जिल्ह्याच्या मुख्यालयी व वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकात हा हिरकणी कक्ष उपयोगिता सिद्ध करणाराच ठरला आहे.
हिरकणी कक्षाची रोज होते स्वच्छता
हिरकणी कक्षाचा वापर कोरोना काळात हव्या त्या प्रमाणात झाला नाही, पण बसेस सुरू झाल्यानंतर हिरकणी कक्षाची आधीप्रमाणेच दररोज स्वच्छता केली जाते. आताही संसर्गाची भीती मातांमध्ये दिसून येते. कक्षाचा वापर वाढविण्यासंदर्भात मातांमध्ये जनजागृती करण्यावर आम्ही भर दिला आहे.
- सारिका लिमजे
वाहतूक अधिकारी, भंडारा
बाळाच्या संगोपनासाठी महत्त्वाचा
बाळाला दूध पाजण्यासाठी हिरकणी कक्षात बसण्याची व्यवस्था आहे. भंडारा येथील बसस्थानकात हिरकणी कक्ष स्वच्छ आहे. कोरोनाची भीती मनात न बाळगता मातांनी हिरकणी कक्षाचा वापर करावा. बाळाच्या संगोपनासाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
निशा कांबळे,
प्रवासी महिला