गुणवंत विद्यार्थ्यांच्या आईंचा होणार सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:38 AM2021-09-26T04:38:24+5:302021-09-26T04:38:24+5:30
मोहाडी : विद्यार्थ्यांनी अभ्यासाची मनापासून तयारी करावी. क्षमता विकसित करण्याची प्रेरणा मिळावी. स्वतःचे ठरविलेले उद्दिष्ट तडीस घेऊन ...
मोहाडी : विद्यार्थ्यांनी अभ्यासाची मनापासून तयारी करावी. क्षमता विकसित करण्याची प्रेरणा मिळावी. स्वतःचे ठरविलेले उद्दिष्ट तडीस घेऊन जावे. लेकींनी उतुंग यश मिळवावे. मुलींच्या कर्तृत्वाचा आईंना सन्मान मिळावा यासाठी मोहगाव देवी येथील महात्मा ज्योतिबा फुले शाळेने कर्तृत्व लेकीचा- सन्मान आईंचा हा उपक्रम हाती घेतला आहे. मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी येथील महात्मा ज्योतिबा फुले ही शाळा उपक्रमशील शाळा म्हणून परिचित आहे. ग्रामीण भागातील सावित्रीच्या लेकींनी उच्च शिक्षणाची पायवाट मजबूत करावी. मुलींना शिक्षणाची प्रेरणा मिळावी यासाठी तेथील मुख्याध्यापक राजू बांते नेहमीच विविध उपक्रम राबवीत असतात. या वर्षी ‘एक कदम आगे’ या टॅगलाईने वर्षभर विविध उपक्रमांना हात घालत आहेत. मुलींनी कार्यक्षम व्हावे. आयुष्यात येणारे चांगले-वाईट अनुभव आपल्याला पुढील रस्ता चालण्याचे धैर्य आई देत असते. अपयश आलं तरीही खचून न जाता पुढील मार्ग निवडण्याची निर्णयक्षमता लेकींमध्ये आईच निर्माण करीत असते. जीवनाची खरी दिशा दाखविणारी माता असते. अशा सावित्रीच्या मातेचा सन्मान मुलीच्या कर्तृत्वाने व्हावा. लेकींनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या बळावर उभे राहावे. तसेच लेक वाचवा-लेक शिकवा हा संदेशाचा प्रसार समाजात अधिक व्हावा हा हेतू या उपक्रमाचा आहे. क्षमता विकसित झाल्या पाहिजेत. तसेच लेकींच्या गुणांचे कौतुक आईंच्या सन्मानाने करायचा या हेतूने नावीन्य उपक्रम राबविला जात आहे.
बॉक्स
असा असेल उपक्रम
दहावीची प्रथम सराव परीक्षा २९ नोव्हेंबरपासून केली जाणार आहे. या पहिल्या परीक्षेत ९० टक्के अधिक गुण घेणाऱ्या व प्रथम येणाऱ्या मुलींच्या आईंचा साडी व चोळी देऊन सन्मान केला जाणार आहे. तसेच मुलांमधून ९२ पेक्षा अधिक घेणाऱ्या मुलांच्या आईंना तोच सन्मान देण्यात येणार आहे. तसेच मुला-मुलींमधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना खास भेट दिली जाणार आहे. तसेच ९० टक्के अधिक गुण घेणाऱ्या मुलांच्या आईंना भेटवस्तू दिली जाणार आहे.
कोट
विद्यार्थ्यांच्या यशात सर्वात मोठा वाटा आईचा असतो. बहुधा विद्यार्थ्यांचा मंचावर कौतुक व गौरव केला जातो. पण, त्या मागे अदृश्य असा आईचा पाठबळ व तेवढीच मेहनत असते. विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा सलाम आईंना करता यावा .अनेक आईंना लेक शिकली पाहिजे याची प्रेरणा मिळावी म्हणून उपक्रम हाती घेतला आहे.
राजू बांते
मुख्याध्यापक, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल, मोहगाव देवी