चारगाव सुंदरीत ‘टोचाल तर वाचाल’चा मूलमंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:15 AM2021-09-02T05:15:21+5:302021-09-02T05:15:21+5:30
साकोली : आता ग्रामीण भागातही लसीकरण जनजागृती मोहीम यशस्वी होत असून तालुक्यातील चारगाव (सुंदरी) या १६२५ लोकसंख्या असलेल्या दोन्ही ...
साकोली : आता ग्रामीण भागातही लसीकरण जनजागृती मोहीम यशस्वी होत असून तालुक्यातील चारगाव (सुंदरी) या १६२५ लोकसंख्या असलेल्या दोन्ही गावात (बालके वगळता) लसीकरण मोहीम पूर्णत्वाकडे जात असून फक्त आठ व्यक्ती शिल्लक राहिल्या आहेत. विशेष म्हणजे या ग्रामपंचायत कमिटीने घरोघरी जाऊन ‘टोचाल तर वाचाल’ हा मूलमंत्र दिल्याने संपूर्ण लसीकरण मोहीम यशस्वी होत आहे.
चारगाव/सुंदरी ग्रामपंचायत कमिटीने संपूर्ण लसीकरण जनजागृती मोहीम हाती घेतली. दोन्ही गावांत घरोघरी जाऊन ‘टोचाल तर वाचाल’ हा मूलमंत्र दिला. दोन्ही संयुक्त गावे मिळून १६२५ लोकसंख्या असलेली ही ग्रामपंचायत अखेर संपूर्ण लसीकरण मोहीम यशस्वी करीत आहे. या उपक्रमात सरपंच मोहन लंजे, उपसरपंच लता भिवगडे, सदस्य कमिटीचे रूपेश मोटघरे, मनोज जुगनाके, कविता वलथरे, मंगला सोनवाने, नरेश लंजे, सुरेश लंजे, मनिराम लंजे, धनराज बागडे, महागू कापगते, तंमुस अध्यक्ष राजकुमार लंजे, सचिव झोडे, तलाठी शेखर ठाकरे, आशा कार्यकर्ता खोब्रागडे, डॉ. कापगते, जि. प. शाळेचे सर्व शिक्षकवृंद तसेच गावकऱ्यांचा सहभाग आहे.