मौदा आश्रमाला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:32 AM2021-01-22T04:32:24+5:302021-01-22T04:32:24+5:30
साकोली : राज्यस्तरीय तीर्थक्षेत्र ब वर्ग प्राप्त असलेल्या नागपूरजवळील परमात्मा एक सेवक मौदा आश्रम या तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ निर्मितीच्या दृष्टीने ...
साकोली : राज्यस्तरीय तीर्थक्षेत्र ब वर्ग प्राप्त असलेल्या नागपूरजवळील परमात्मा एक सेवक मौदा आश्रम या तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ निर्मितीच्या दृष्टीने युद्धपातळीवर गती द्यावी, त्या दृष्टीने पर्यटन आणि ग्रामविकास विभागाने तातडीने संयुक्त बैठक घेऊन बृहत आराखडा अमलात आणण्यासाठी कारवाई करावी, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
या संदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नाना पटोले म्हणाले की, या तीर्थक्षेत्राला छत्तीसगड, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश अशा सीमा भागातील हजारो भाविक आणि पर्यटक भेटी देत असतात. मात्र सुविधा अपुऱ्या असल्यामुळे आणि रस्ते सुस्थितीत नसल्यामुळे भाविकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या तीर्थक्षेत्रात विकासाच्या दृष्टीने मोठे कार्य घडेल. हे आश्रम पर्यटनस्थळ म्हणूनही नामांकित आहे. अशावेळी तीर्थस्थळासह पर्यटनस्थळ निर्मितीच्या भावनेने या प्रस्तावाला शासनाने मान्यता देणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामविकास आणि पर्यटन विभागाने संयुक्त बैठक घेऊन हा प्रस्ताव युद्धपातळीवर मार्गी लावण्याच्या सूचना पटोले यांनी यावेळी केल्या.
यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, तीर्थक्षेत्राच्या विकासाला शासन नक्कीच प्राधान्य देईल. तीर्थस्थळासह पर्यटनस्थळ निर्मिती करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. रस्त्याची कामे ग्रामविकास विभागामार्फत करण्यासाठी ग्रामविकास आणि पर्यटन विभागाची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तर परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे अध्यक्ष राजू मदनकर यांनी यावेळी सांगितले की, सेवकांची संख्या वाढल्यामुळे सुविधा कमी पडत आहेत. त्यासाठी शासनाने वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा. त्या माध्यमातून भाविकांसाठी पायाभूत सुविधा, रस्ते, विश्रामगृह, मनोरंजनासाठी लायटिंग शो अशा सुविधा उभारता येतील. त्यासाठी अंदाजे ४४ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो प्रस्ताव शासनाने मान्य करण्यात यावा, अशी मागणीही अध्यक्ष मदनकर यांनी केली. मौदा आश्रम येथे दरवर्षी लाखो सेवक येत असून या स्थळाला पर्यटनस्थळ घोषित करावे, अशी मागणी सेवकांची आहे.