नवीन इमारतीत दवाखाना स्थानांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:31 AM2021-01-13T05:31:58+5:302021-01-13T05:31:58+5:30
चुल्हाड गावात कोट्यवधी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तयार करण्यात आली असून, उदघाटनाच्या प्रतीक्षेत होती. इमारतीचे जलदगतीने लोकार्पण ...
चुल्हाड गावात कोट्यवधी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तयार करण्यात आली असून, उदघाटनाच्या प्रतीक्षेत होती. इमारतीचे जलदगतीने लोकार्पण करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत होते. आयुर्वेदिक दवाखान्यात असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा नवनिर्मित इमारतीत सुरू करण्यासाठी दबाव वाढला होता. जुन्या इमारतीत आरोग्य सेवा देताना कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकही नवीन इमारतीत आरोग्य सेवा प्राप्त करण्यासाठी अपेक्षित होते. दरम्यान, नवीन सुसज्ज इमारतीच्या लगत वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वसाहतीचे बांधकाम करण्यात आले आहे. सर्व सुविधा असणाऱ्या या नवनिर्मित इमारतीचे भव्य उद्घाटन कार्यक्रमाच्या आयोजनावरून राजकीय लोकप्रतिनिधी आशावादी होते. परंतु गुरुवारी या नवनिर्मित इमारतीचे फीत कापून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत लोकार्पण केले. ज्या कार्यासाठी इमारतीचे बांधकाम झाले आहे, त्यात जलदगतीने ग्रामीण जनतेला आरोग्य सेवा मिळाल्या पाहिजेत, हा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. नवीन इमारतीत गाजावाजा न करता आरोग्य विभागाने दवाखाना स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या नवनिर्मित इमारतीत आधीच जुन्या इमारतीतून साहित्य हलविण्यात आले होते. यामुळे इमारतीचे लोकार्पण होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. परंतु अधिकृत माहिती कुणीही देत नव्हते. येत्या काही महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका असल्याने सत्ताधारी लोकप्रतिनिधी गाजावाजा करीत भव्य कार्यक्रम उभारतील, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु या दिशेने कुणीही शब्द काढले नाही. सर्व लोकप्रतिनिधींनी जनतेच्या आरोग्य सेवेला महत्त्व दिले. यामुळे लोकार्पण सोहळा मोजक्याच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आटोपता घेण्यात आला आहे. या इमारतीचे लोकार्पण होताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा देण्यास सुरुवात केली आहे. रुग्णात समाधानाचे चित्र निर्माण झाले आहे. लोकार्पण करताना राजकीय कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, गावातील गणमान्य नागरिकांना दूर ठेवण्यात आले. भव्य इमारतीत दवाखाना स्थानांतरित करण्यात आल्यानंतर नागरिकांची आरोग्य सेवा, व अन्य आरोग्यविषयक जनजागृती उपक्रम राबविण्यासाठी अपेक्षा वाढल्या आहेत. या केंद्रांतर्गत उपकेंद्र संचालित करण्यात येत आहे. उपकेंद्रात दर्जेदार आरोग्य सुविधा महिलांना दिल्या जात आहेत. परिसरात आरोग्य सेवा व सुविधा समाधानकारक असल्याने नागरिक मागणी करीत नाहीत. सेवा देणारे टीम वर्क चांगले आहे. दरम्यान परिसरात आंग्ल दवाखाना, ग्रामीण रुग्णालय आणि आता प्राथमिक आरोग्य केंद्र प्रत्येकी पाच किमी अंतरावर आहेत. यामुळे दवाखान्यात सोनोग्राफी, एक्स-रे मशीन आल्या पाहिजेत. तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सेवा आता ग्रामीण रुग्णालयात आल्या पाहिजेत, असे मत ग्रामीण रुग्ण व्यक्त करीत आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाने चुल्हाडच्या दवाखान्यात स्थानांतरणाचा उत्तम आणि सकारात्मक निर्णय घेतल्याने कौतुक होत आहे.