शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच
By admin | Published: August 18, 2016 12:16 AM2016-08-18T00:16:44+5:302016-08-18T00:16:44+5:30
तालुक्यातील कृषीपंपाचे भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी शेतकरी दोन महिन्यापासून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत.
ऊर्जामंत्र्यांशी बैठक रद्द : भारनियमन मात्र ‘जैसे थे’
साकोली : तालुक्यातील कृषीपंपाचे भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी शेतकरी दोन महिन्यापासून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. एवढेच नाही तर शेतकऱ्यांनी उर्जामंत्री बावनकुळे यांच्याशी प्रत्यक्षात भेट घेऊन चर्चा केली. मात्र त्यातही तोडगा निघाला नाही. शेवटी शेतकऱ्यांनी काल मंगळपासून वीज वितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे.
यावर्षी पावसाळ्यापूर्वीपासूनच कृषी पंपाचे १६ तासांचे भारनियमन सुरु आहे. हे भारनियमन सुरु असल्यामुळे शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली. तर कशीबशी केली. त्या शेतकऱ्यांसमोर आता पाणी कुठून आणायचे असा प्रश्न निर्माण झाला. कारण १६ तासांच्या भारनियमनामुळे फक्त ८ तास वीज पुरवठा मिळत आहे व या आठ तासात शेतीला पाणीपुरवठा होऊ शकत नाही. परिणामी शेतातील धानाचे काय होईल या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
१६ तासांचे भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीला निवेदन दिले. प्रत्यक्षात कार्यकारी अभियंता यांना या संदर्भात माहिती दिली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. अखेर दि. १४ ला शेतकऱ्यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्षात भेट घेऊन चर्चा केली. यावर बावनकुळे यांनी १६ ला सकाळी संबंधित अधिकारी व खासदार, आमदार व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ यांची बैठक बोलाविली होती. मात्र ती आज रद्द करण्यात आली. मात्र जोपर्यंत हे भारनियमन बंद होणार नाही. तोपर्यंत आंदोलन करू अशी भूमिका शेतकऱ्यांची असल्याने आजपासून हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. अशोक कापगते, अविनाश ब्राम्हणकर, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, केवळराम लांजेवार, नरेंद्र वाडीभस्मे, शैलेश गजभिये, बोरकर यांच्यासह तालुक्यातील हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)