बावनथडीच्या पाण्याकरिता शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 09:51 PM2019-01-11T21:51:00+5:302019-01-11T21:52:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : रब्बी पिकाकरिता बावनथडी प्रकल्पाचे पाणी बघेडा व कारली जलाशयात सोडण्याकरिता तुमसर-कटंगी आंतरराज्यीय महामार्गावर बघेडा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : रब्बी पिकाकरिता बावनथडी प्रकल्पाचे पाणी बघेडा व कारली जलाशयात सोडण्याकरिता तुमसर-कटंगी आंतरराज्यीय महामार्गावर बघेडा फाटा येथे शुक्रवारी शेतकऱ्यांसोबत राजकीय पदाधिकाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. सुमारे अर्धा तास रस्त्यावरील वाहतूक बंद होती. तुमसर व गोबरवाही पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पाच दिवसानंतर कारवाईचे आश्वासन प्रकल्प अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
बघेडा तथा गोबरवाही परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी सरीप पीके, गहू, चना, धान लावली आहेत, पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज आहे. प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावर बघेडा फाट्याशेजाररी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यासोबत राजकीय पदाधिकाºयांनी आंदोलनात सहभाग घेतला.
यात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश रहांगडाले, राजू माटे, जि.प. सभापती रेखा ठाकरे, उमेश कटरे, उमेश तुरकर, पं.स. सदस्य बाळकृष्ण गाढवे, शरद खोब्रागडे, अनिल टेकाम, संजय बिसेन, अरुण झोडे, माजी जि.प. उपाध्यक्ष रमेश पारधी, प्रदेश काँग्रेस सचिव प्रमोद तितीरमारे, दिलीप सोनवाने, किशोर हुमणे, देवचंद ठाकरे, ठाकचंद मुुंगुसमारे, पं. स. सदस्य शिशुपाल गौपाले, नगरसेवक बाळा ठाकूर, बंडू रहांगडाले, अनिल चौधरी, कमलेश ठाकूर, सुनिल टेंभरे सह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
बावनथडी प्रकल्पाच्या उपविभागीय अधिकारी सिंग यांनी पाच दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. यावेळी नायब तहसीलदार अशोक पाटील, गोबरवाहीचे सहायक पोलीस निरीक्षक म्हसकर, तुमसरचे पोलीस निरीक्षक मनोज सिडाम यांनी चोख बंदोबस्त केला होता.