आरक्षणासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:33 AM2018-08-10T00:33:23+5:302018-08-10T00:36:19+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला भंडारा शहरासह जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. भंडारा शहरात दिवसभर सर्व व्यवहार सुरळीत होते. गुरुवारी सकाळी सकल मराठा समाजाच्यावतीने मोटरसायकल रॅली काढून येथील जिल्हा कचेरी परिसरात पाच तास ठिय्या देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला भंडारा शहरासह जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. भंडारा शहरात दिवसभर सर्व व्यवहार सुरळीत होते. गुरुवारी सकाळी सकल मराठा समाजाच्यावतीने मोटरसायकल रॅली काढून येथील जिल्हा कचेरी परिसरात पाच तास ठिय्या देण्यात आला. तर भंडारा नागपूर मार्गावरील एसटी बससेवा दुपारपर्यंत ठप्प झाली होती. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी गुरुवारी राज्यव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते. भंडारा शहरातही सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले. सकाळी १० वाजताच्या सुमारास शुक्रवारी येथून दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हातात भगवा झेंडा घेतलेले शेकडो नागरिक यात सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून दुचाकी रॅली आणि मोर्चाला प्रारंभ झाला. व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात आले. मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान हा मोर्चा येथील जिल्हाधिकारी कार्यालय चौकात पोहचला. त्या ठिकाणी मोर्चेकºयांनी तब्बल पाच तास ठिय्या दिला. यावेळी मराठा आंदोलनात शहीद झालेल्या तरुणांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. यावेळी राजेंद्र लिमसे, विजय घाडगे, प्रकाश कोलते, अविनाश उन्हाळे, सुनिल कापसे, संजय तुपटे, सुशिल शिंदे, प्रवीण कापसे, सुधाकर घोरपडे, संजय मोहीते, ज्ञानेश्वर निकम, पराग पवार, दिलीप फुकटे, प्रमोद कोल्हे, सतीष घोरपडे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.
नागपूर येथे काही बसेसवर दगडफेक झाल्याचे वृत्त धडकल्याने भंडारा ते नागपूर बससेवा सकाळी ९ वाजतापासून बंद करण्यात आली. दुपारी ३ वाजतानंतर ही बससेवा सुरू करण्यात आली. शहरातील संपूर्ण वाहतूक मात्र दिवसभर सुरळीत होती. ग्रामीण भागातील बससेवेवरही कोणताच परिणाम जाणवला नाही.
आरक्षणाचा निर्णय लवकर घ्या
महाराष्ट्र राज्यात मराठा समाज कोट्यवधीच्या घरात आहे. मराठ्यांची कर्मभूमी सुद्धा महाराष्ट्र आहे. इतिहासात आपल्या प्राणांची आहुती या समाजाने स्वराज्याच्या रक्षणासाठी दिली. आजही संपूर्ण देशभर मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्याही हा समाज मागे पडत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक जण उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. त्यामुळे मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.