तुमसर बाजार समितीवर प्रशासक नेमणुकीच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:36 AM2021-03-17T04:36:15+5:302021-03-17T04:36:15+5:30
मोहन भोयर तुमसर : बाजार समितीच्या पोटनियमानुसार सोपविलेली जबाबदारी व कर्तव्य पार पाडण्यात हेतुपुरस्सर व जाणीवपूर्वक कसूर करीत आपल्या ...
मोहन भोयर
तुमसर : बाजार समितीच्या पोटनियमानुसार सोपविलेली जबाबदारी व कर्तव्य पार पाडण्यात हेतुपुरस्सर व जाणीवपूर्वक कसूर करीत आपल्या अधिकारपदाचा दुरुपयोग करण्याच्या ठपका तुमसर बाजार समिती संचालक मंडळावर ठेवण्यात आला आहे. प्रशासकाची नेमणूक का करण्यात येऊ नये, अशी विचारणा जिल्हा उपनिबंधकांनी केली आहे. सात विविध मुद्द्यांवर आक्षेप नोंदविण्यात आले असून, बाजार समिती बरखास्त करून प्रशासक नेमणुकीच्या हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे.
बाजार समितीच्या ओपन शेड बांधकामाकरिता राज्य पणन मंडळ पुणे यांनी मंजूर निविदेला जादा अंदाजपत्रकीय रकमेस या अटी व शर्थीस अधीन राहून मान्यता दिली; परंतु कंत्राटदाराने बांधकाम मुदतीत पूर्ण केले नाही. मुदतवाढीसाठी कंत्राटदाराने समितीकडे विनंती अर्ज केला. त्यानंतर संचालक मंडळाने कंत्राटदारास मुदतवाढ दिली. मात्र त्यासाठी राज्य कृषी मंडळाची मंजुरी घेतली नाही. बाजार समितीने तीन हजार शाली खरेदी केल्या. सदर शालींची किंमत तीन लाख ६६ हजार इतकी आहे. या शाली सहकारी संस्थांचे पदाधिकारी व शेतकऱ्यांना शेतकरी मेळाव्यात व सर्वसाधारण सभेत वाटप करण्यात आल्या. मात्र शाली खरेदी करताना निविदा प्रक्रियेचा अवलंब केला नाही तसेच खर्च करण्यास सक्षम अधिकाऱ्यांची परवानगीही घेतली नाही. मिठाई खरेदीसाठी ७७ हजार ४२५ रुपये अदा केले. बाजार समितीने कॅलेंडर छपाईसाठी तीन लाख ३९ हजार रुपये खर्च केला. यात बाजार समिती निधीचा दुरुपयोग झाला. हा खर्च समितीच्या फंडातून करण्यात आला. या खर्चास सक्षम अधिकाऱ्यांची मंजुरी घेतली नसल्याचे दिसून येते. खुल्या ओट्यासाठी एक लाख ६६ हजार ९२१ रुपये इतकी रक्कम जास्त दिलेली आहे. या सर्व खर्चावर लेखापरीक्षकांनी आक्षेप नोंदविला आहे. सिमेंट रोड अंदाजपत्रकात कंत्राटदाराला एक लाख ७१ हजार ३१९ अधिक पैसे देण्यात आले. वाढीव बांधकामास कृषी पणन मंडळाची परवानगी नसल्याचे दिसून येते. आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत तुमसर व मोहाडी तालुक्यातील धान खरेदी केंद्रांना जोडून टोकण देणे, ताडपत्री पुरवठा करणे, शेतकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे, आर्द्रता मापकयंत्र पुरवठा करणे ही जबाबदारी बाजार समितीची आहे. धान्य खरेदी केंद्रांना गावे जोडताना वारंवार गावे जोडणे, मनमर्जीने परत जोडणे यामुळे शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. यावरून सदर बाजार समिती संचालक मंडळाने महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यात कसूर करीत असल्याचे दिसून येत असल्याचे म्हटले आहे.