जिल्हाधिकारी साहेब, तस्करांचा डाव हाणून पाडणार काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:40 AM2021-08-21T04:40:27+5:302021-08-21T04:40:27+5:30
लाखांदूर तालुक्यातील चुलबंद व वैनगंगा नदी काठावरुन गत काही महिन्यांपासून स्थानिक तालुका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाने मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध ...
लाखांदूर तालुक्यातील चुलबंद व वैनगंगा नदी काठावरुन गत काही महिन्यांपासून स्थानिक तालुका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाने मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा व वाहतूक केली जात आहे. या नदीघाटांमध्ये दिघोरी, साखरा, चिकणा, तावशी, खोलमारा, तई, धर्मापुरी, कोच्छी, मांढळ, भागडी, आथली, आसोला, चप्राड, सोनी, आवळी, टेंभरी, विहीरगाव, गवराळा, दोनाड व ईटान आदींचा समावेश आहे.
दरम्यान, तालुक्यातील नांदेड येथील लिलावीत रेटीघाटाअंतर्गत गत १० जूनपासून उपसा बंद करण्यात आल्याने स्थानिक नांदेड गावातीलच काही रेती तस्करांनी रेतीघाट परीसरात रेतीचा अवैध उपसा व वाहतूक चालविल्याची ओरड आहे. या गैरप्रकाराची माहिती रेतीघाट चालकास होताच लिलावीत रेतीघाट परीसरात नाल्या खोदुन नदीपात्रातील अवैध रेती वाहतुकदारांचा रस्ता बंद पाडला. तथापि, काही तस्करांनी खोदलेल्या नाल्या बुजवुन बेकायदेशीरपणे रेतीचा अवैध उपसा चालविल्याची तक्रार रेतीघाट मालकाने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
दरम्यान, गत दोन महिण्यापुर्वी तालुक्यातील टेंभरी - विहीरगाव येथे स्थानिक लाखांदूर तहसीलदारांनी जवळपास २०० ते २५० ब्रॉस रेतीचा अवैध साठा जप्त केला आहे. मात्र रेतीसाठा जप्त करुन तब्बल दोन महिण्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला असतांना अवैध रेतीसाठा प्रकरणी एकाही तस्कराविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात न आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
तथापि, विहीरगाव येथील अवैध रेतीसाठा प्रकरणी तस्करांची नावे उघड होऊनही दबावापोटी सबंधितांचे विरोधात कारवाई न करता प्रकरण दडपल्याचा आरोप देखील जनतेत केला जात आहे. एकंदरीत तालुक्यात गत काही महिण्यापासून सुरु असलेली रेतीची अवैध तस्करी नांदेड येथील लिलावीत रेतीघाटामुळे प्रशासनाच्या कारवाईत बंद पडण्याची भिती तस्करांत व्यक्त केली जात असल्याची चर्चा आहे.
सदर भितीपोटीच स्थानिक नांदेड येथील काही रेती तस्करांसह तालुक्यातील काही तस्करांनी संगणमताने लिलावीत रेतीघाट बंद पाडण्यासाठी धडपड चालविल्याची जोरदार चर्चा असुन जिल्हाधिकारी साहेब , तस्करांचा डाव हाणून पाडणार काय ? असा सवाल जनतेत केला जात आहे.