महावितरणच्या कारभाराने ग्राहक त्रस्त
By admin | Published: February 8, 2017 01:47 AM2017-02-08T01:47:35+5:302017-02-08T01:47:35+5:30
कंत्राटदाराकडून मुदत सपंल्यानंतर वीज बिलाचे वितरण करण्यात आल्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
मुदतीनंतर विज बिलाचे वाटप : ग्राहकांना आर्थिक भुर्दंड
बारव्हा : कंत्राटदाराकडून मुदत सपंल्यानंतर वीज बिलाचे वितरण करण्यात आल्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन विद्युत बिल वेळेवर कसे मिळतील याची दक्षता घ्यावी, अशी मागणी वीज ग्राहकांकडून केली जात आहे.
लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथे ३३ केव्ही उपकेंद्र असून कनिष्ठ अभियंता लाडके कार्यरत आहेत. ते लाखांदूर येथून अपडाऊन करीत असल्याने वीज ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याच कार्यालयातून विद्युत बिलाचे वितरण कंत्राटदाराकडून करण्यात येते. मागील कित्येक दिवसांपासून विज ग्राहकांना दिेलेल्या तारखेच्या आत संबंधित ग्राहकांच्या हाती विजबिल मिळत नसल्याने दंडापोटी १० ते ५० रूपयाचा आर्थिक भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागत आहे. बारव्हा परिसरात ही बाब नित्याचीच झाली आहे.
यासंबंधाने काही ग्राहकांनी शाखा अभियंता लाडके यांना या सर्व प्रकाराची माहिती देण्यात आली. मात्र याकडे लक्ष द्यायला कुणीही तयार नाही. उलट आम्ही बिलाचे वाटप करतो का? ते बिलावरूनच पाठविण्यात येतात.
ही चुकी बिल वाटप करणाऱ्यांची आहे. आम्ही काहीही करू शकत नाही. अशी माहिती वीज विभागाच्या अभियंत्यांनी दिली. आधीच विद्युत विभागाकडून वेगवेगळ्या आकारणीच्या माध्यमातून वीज ग्राहकांची आर्थिक लूट करण्यात येत आहे. त्यात वाहन आकार म्हणून विवरणात समावेश केला आहे. त्यामुळे एवढी लुटमार होत असतांना सुध्दा मुदतीनंतर बिलाचे वाटप करून प्रत्येक ग्राहकांकडून १० ते ५० रूपये दंडापोटी वसुल केले जात आहे.
जर हे जास्तीचे बिल भरले नाही अथवा बिल घेण्यास नाकारले तर दुसऱ्या दिवशी वीज कनेक्शन कापण्यात येतो.
महावितरणच्या या प्रकाराला कुणी आळा घालणार कां? किंवा जनतेची लूट अशीच सुरू राहणार असा गंभीर प्रश्न नागरिकांना पडला आहे. (वार्ताहर)