महावितरणची पाच दिवसांत ३४ लाखांची वसूली

By admin | Published: November 17, 2016 12:37 AM2016-11-17T00:37:21+5:302016-11-17T00:37:21+5:30

थकीत वीज देयकाच्या वसुलीसाठी अभय योजना कृषी संजीवनी योजना अंमलात आणल्या.

MSEDCL recovery of Rs 34 lakhs in five days | महावितरणची पाच दिवसांत ३४ लाखांची वसूली

महावितरणची पाच दिवसांत ३४ लाखांची वसूली

Next

अच्छे दिन : वीज देयके भरण्यासाठी ग्राहकांची गर्दी
भंडारा : थकीत वीज देयकाच्या वसुलीसाठी अभय योजना कृषी संजीवनी योजना अंमलात आणल्या. महावितरणाला थकबाकीदारांकडून वीज बिलाची वसुली करता आली नाही. चलनातून ५०० व १००० रूपयांचे नोट बंद होताच महावितरण कंपनीला अच्छे दिन आले आहे.
मागील पाच दिवसात भंडारा-गोंदिया परिमंडळाच्या तिजोरीत एक कोटी ३ लाख रूपये जमा झाले असून भंडारा जिल्ह्यातील थकीत ग्राहकांकडून ३४ लाख १८ हजार रूपयांची वसुली झाली आहे. जुन्या नोटा स्वीकारण्यास २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्यामुळे ग्राहकांनी वीज देयके भरण्यासाठी वीज बिल भरणा केंद्रावर एकच गर्दी केली आहे. केंद्र शासनाने ८ नोव्हेंबरला चलनातून ५०० व एक हजाराची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अडचणींचा सामना करावा लागत असल्याने राज्य शासनाने कर भरणाऱ्या खातेदारांकडून जुन्या नोट स्वीकारण्याचे निर्देश दिले.
१४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मुदत असल्याने वीज ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयात गर्दी करून थकीत बिले भरली. यातून महावितरणच्या तिजोरीत पाच दिवसात ३४ लाख १८ हजार रूपयांची वसुलीची भर पडली.
भंडारा जिल्ह्यात ३९ हजार ७९७ ग्राहकांकडे विज देयकाची कोट्यवधी रूपयांची थकबाकी आहे. या थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या महावितरण कंपनीने वसुलीसाठी कृषी संजीवनी योजना व अभय योजना अंमलात आणलेली आहे.
कोट्यवधीच्या थकबाकीची वसुली करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी येतात. मात्र चलनातून बाद झालेल्या नोटा स्वीकारण्यात येत असल्याने योजनांकडे पाठ फिरविलेल्या ग्राहकांकडून वसुली झाल्याने महावितरण कंपनीला दिलासा मिळाला आहे. (नगर प्रतिनिधी)

२४ नोव्हेंबरपर्यंत स्वीकारणार जुन्या नोटा
वीज बिल भरण्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत महावितरण घरगुती व वैयक्तिक ग्राहकांच्या जुन्या ५०० व हजाराच्या नोटा स्वीकारणार आहे. यासाठी महावितरणची वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहे. ग्राहकांचे वीज बिल जेवढ्या रकमेचे राहील तेवढ्या रकमेच्या जुन्या ५०० व हजाराच्या नोटा महावितरण स्वीकारणार आहे. वीज बिलापोटी आगावू स्वरुपात रक्कम स्वीकारण्यात येणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. वीज बिल भरणा केंद्रावर महावितरणच्या नियमित कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती केली आहे. सदर कर्मचारी दिवसभर जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी ग्राहकांचे अर्ज भरून देण्यास सहकार्य करतील. असे महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Web Title: MSEDCL recovery of Rs 34 lakhs in five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.