चिखला खाणीत रेतीचा भराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 10:03 PM2017-12-27T22:03:52+5:302017-12-27T22:04:13+5:30
केंद्र शासनाच्या भूमीगत चिखला खाणीत मागील अनेक वर्षापासून मॅग्नीज काढलेल्या खड्ड्यात रेतीचा भरणा करण्यात येत आहे.
मोहन भोयर।
आॅनलाईन लोकमत
तुमसर : केंद्र शासनाच्या भूमीगत चिखला खाणीत मागील अनेक वर्षापासून मॅग्नीज काढलेल्या खड्ड्यात रेतीचा भरणा करण्यात येत आहे. लाखो ब्रास रेती आतापर्यंत यासाठी वापरण्यात आली आहे. मॉईल प्रशासनाने बावनथडी नदी पात्रातून रेतीची लीज घेतली आहे. ब्रिटीश काळापासून रेतीचा भराव हा प्रकार सुरुच आहे. दुसरीकडे उड्डाणपुलाच्या बांधकामात वीज कारखान्यातील अॅशचा वापर केला जात असताना भूमीगत खाणीत त्याचा वापर का नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
तुमसर तालुक्यातील चिखला येथे ब्रिटीशकालीन भूमीगत मॅग्नीज खाण आहे. या खाणीतून मॅग्नीज काढल्यानंतर विहिरीसारखे खड्डे पडतात. भूस्खलन होऊ नये याकरिता त्या खड्ड्यात रेतीचा भरणा करण्यात येतो. मॉईल प्रशासनाने रेती भरण्याकरिता बावनथडी नदी पात्रातील लीज शासनाकडून घेतली आहे. चिखला खाण परिसरात रेतीचे साठे आहेत. दरदिवशी किमान १०० ट्रक मॅग्नीज भूगर्भातून काढण्यात येते. तेवढीच रेती तिथे भरावाकरिता वापरली जाते. चिखला खाण परिसरात मिनी रेती घाट तयार झाला आहे. केंद्र शासनाने पर्यायी भरणाचा पर्याय येथे शोधण्याची निश्चितच गरज होती. नदी पात्रात पूर्वीसारखी रेती उपलब्ध नाही. त्यामुळे रेतीचा भरणा करणे परवडणारे नाही. उड्डाणपुल बांधकामात माती मुरुमाचा भरणा यापूर्वी करण्यात येत होता. सध्या वीज कारखान्यातील अॅशचा वापर केला जातो.
सिमेंट कारखान्यात या अॅशचा वापर केला जातो. अॅश मजबूत व सिमेंटसारखी मजबूत आहे. केंद्र तथा राज्य शासनाने अॅशच्या वापराची परवानगी दिली आहे. उड्डाणपुलावरून जड वाहतूक २४ तास सुरु असते. त्यामुळे काहीच फरक पडत नाही. मॉईल खाणीत भराव केल्यास लाखो ब्रास रेती वाचू शकते.
चिखला भूमीगत खाणीत बावनथडी नदी पात्रातून रेती आणली जाते. येथे मॉईल प्रशासनाने लीज घेतली आहे. रेतीचा भरावाकरिता उपयोग केला जातो. केंद्र शासनाच्या निर्देशानुसारच कार्य सुरू आहे.
-रुहुल अमीन शेख,
व्यवस्थापक चिखला खाण