चिखलमय पांदण रस्त्यामुळे शेतकऱ्यांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 06:00 AM2019-09-16T06:00:00+5:302019-09-16T06:00:47+5:30
रस्त्याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला तरी हे आश्वासन फोल ठरत ठरले आहे. पालकमंत्री पांदन रस्ता अंतर्गत जिल्ह्यातील पांदन रस्त्यांना न्याय देण्याचा शब्द न पाळल्याने यांत्रीकीकरणाच्या युगातही शेतकरी चिखलातूनच स्वत: बैलगाडी काढण्याची नामुष्की ओढवली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर (चौ.) : शेतकऱ्यांना रस्त्याची पायाभूत सुविधादेखील मिळत नसल्याने पालांदूरातील शेतकºयांचा शासनाविरोधात संताप अनावर होत आहे. शेतात जाण्यासाठी चांगला रस्ताच नसल्याने लाखनी तालुक्यातील पालांदूर शेतशिवारात खराशी पुलाजवळील दोन किलोमीटर पांदन रस्त्याच्या चिखलातून प्रवास करणे शेतकऱ्यांना मुश्कील झाले आहे.
रस्त्याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला तरी हे आश्वासन फोल ठरत ठरले आहे. पालकमंत्री पांदन रस्ता अंतर्गत जिल्ह्यातील पांदन रस्त्यांना न्याय देण्याचा शब्द न पाळल्याने यांत्रीकीकरणाच्या युगातही शेतकरी चिखलातूनच स्वत: बैलगाडी काढण्याची नामुष्की ओढवली आहे.
खराशी रस्ता ते नारायण कडूकार गुरुजींंच्या शेतापर्यंत दोन किलोमीटर पांदन रस्ता मागील कित्येक वर्षापासून चिखलमय आहे. या चिखलात शेतकरी स्वत: बंडी ओढून शेतीत जाण्यासाठी कसरत करतो आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती दूर अंतरापर्यत असल्याने बंडीशिवाय शेतीसाहित्य शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहचवता येत नाही. त्यामुळे अनेकदा बैलांना देखील येथून चालणे शक्य होत नाही.त्यामुळे अनेकदा एकमेकांची मदत घेवून एकमेकांची चिखलात रुतलेली बैलबंडी शेतकऱ्यांना बाहेर काढावी लागते. पावसाची संततधार सतत सुरु असल्याने येथील चिखल वाढला असल्याने बंडीला अर्धा -एक फुटातून चिखल कापत रस्ता पार करावा लागतो आहे. यासाठी शेतकºयांनी वारंवार याविषयी बांधकाम विभाग लाखांदूर येथे तक्रार केली आहे.त्यावरच न थांबता क्षेत्रातील आमदार, पालकमंत्री, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, उपसरपंच, सरपंच तथा सामाजिक कार्यकर्त्यांना वारंवार भेटून शेतकऱ्यांनी पांदन रस्त्याच्या कामाची मागणी केली आहे.
या पांदन रस्त्यावर चार ठिकाणी मोळी सीडीवर्कचे थातूर मातूर काम झाल्याचे रस्त्याने त्रस्त झालेले शेतकरी प्रभू कडूकार यांनी बोलताना सांगितले. वर्षभर शेतकरी या पांदन रस्त्याने जाणेयेणे करीत असल्याने महत्वाच्या खरीप हंगामात तरी शासनासह, लोकप्रतिनिधींकडे शेतकऱ्यांनी पांदन रस्त्याच्या कामाची त्वरीत मागणी केली आहे. या पांदन रस्त्यावरुन दररोज किमान १५० शेतकरी या पांदन रस्त्याने आवागमन करतात.
खराशी पुलाच्या बांधकामामुळे पांदन रस्ता चिखलमय झाल्याची गावकºयांची तक्रार आहे. रस्त्यावर कंत्राटदाराने बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने जेसीपीच्या सहाय्याने पांदन रस्त्यात खडी मुरमाचा वापर न करता मातीची भरण दिल्याने रस्ता चिखलमय झाला आहे. त्यानंतर रस्त्याचे कोणतेही काम न केल्याने हा पांदन रस्ता जाण्यासाठी शेतकऱ्यांना अडसर ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
खराशी रस्त्यापासून माझ्या शेतापर्यंतच्या पांदन रस्त्याकरिता वारंवार प्रामाणिक प्रयत्न केले. स्वत:ही काही मलबा टाकला. पण चिखल खूप असल्याने संपूर्ण पांदन चिखलात आहे. शासनाने पांदन रस्ता अंतर्गत शेतकऱ्यांना रस्त्याची सुविधा देणे गरजेचे आहे.
-मंगेश येवले,
शेतकरी, पालांदूर (चौ.)