मुग, मटकी ऐवजी पोषण आहार म्हणून मसूर, चवळीचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:39 AM2019-09-01T00:39:02+5:302019-09-01T00:39:48+5:30
अंगणवाडी केंद्राला शासनाकडून आहाराचा पुरवठा करण्यात येतो. यात सहा महिन्याचे तीन वर्ष सर्वसाधारण व सहा महिने ते तीन वर्ष तीव्र कमी वजनाचे बालके तसेच गरोदर व स्तनदा माता यांचा समावेश आहे. सदर आहारात गहू, चवळी, मसूर डाळ, सोयाबीन तेल, हळद पावडर, मिरची पावडर, मीठ या धान्य व इतर साहित्याचा समावेश आहे. या पोषण आहाराचे सिलबंद पाकीट सध्या दिले जात आहेत.
मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : बालके, गरोदर व स्तनदा मातांना पोषण आहाराची सिलबंद पाकीटे वितरीत करण्यात येतात. सदर पाकीटात आतापर्यंत मुग व मटकी दिली जात होती. मात्र गत काही दिवसांपासून मुग, मटकी ऐवजी पोषक आहार म्हणून मसूर व चवळीचा पुरवठा करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोषक तत्वे अधिक असलेला आहार बंद करण्यामागचे कारण म्हणजे मुग व मटकी महाग झाल्याने सांगितले जाते.
अंगणवाडी केंद्राला शासनाकडून आहाराचा पुरवठा करण्यात येतो. यात सहा महिन्याचे तीन वर्ष सर्वसाधारण व सहा महिने ते तीन वर्ष तीव्र कमी वजनाचे बालके तसेच गरोदर व स्तनदा माता यांचा समावेश आहे. सदर आहारात गहू, चवळी, मसूर डाळ, सोयाबीन तेल, हळद पावडर, मिरची पावडर, मीठ या धान्य व इतर साहित्याचा समावेश आहे. या पोषण आहाराचे सिलबंद पाकीट सध्या दिले जात आहेत. परंतु मागील दोन महिन्यांपासून मुग व मटकी पोषण आहारात देणे बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी मसूर व चवळी हा आहार दुबार देण्यात येत आहे. मुग व मटकीचा दर कडाडल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
मुगाचे प्रतिकिलो मुल्य ७० ते ७५ तर मटकीचे दर ७५ रुपये प्रतिकिलो आहे. मसूर व चवळी बाजारात ५५ ते ६० रुपये किलोप्रमाणे उपलब्ध आहे. एक किलोवर २० ते १५ रुपयाचा फटका आहे. मुग आणि मटकीत पोषक तत्वे व फायबर अधिक असतात.
तुमसर येथे एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय आहे. गत दोन वर्षांपासून विस्तार अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. लाखनी येथील विस्तार अधिकारी येथे प्रभारी असून आठवड्यातून दोन दिवस सेवा पुरवित आहेत. मोहाडी येथे बालविकास प्रकल्प अधिकाºयाचे पद रिक्त आहे. तुमसर येथील अधिकारी मोहाडीचा प्रभार सांभाळत आहेत. पोषण आहाराबाबत विस्तार अधिकारी उमेश खाकसे यांना विचारले असता मटकी व तूर देणे सध्या बंद असून त्याऐवजी मसूर व चवळी दिली जात असल्याचे सांगितले.