मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामे अडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:36 AM2021-07-30T04:36:46+5:302021-07-30T04:36:46+5:30
बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रात असणाऱ्या गोंडीटोला, बिनाखी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. ...
बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रात असणाऱ्या गोंडीटोला, बिनाखी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. महालगाव फाटा ते गोंडीटोला आणि ब्राह्मणटोला ते सुकळी नकुल असे गावांचे नियोजन आहे. या दोन्ही गावांचे मध्यंतरी गोंडीटोला गावांचे सीमांकन आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजुरी देण्यात आलेल्या रस्त्यावर मोरीचे बांधकाम कंत्राटदारानी केले आहेत. परंतु सिमेंट रस्ता, डांबरीकरणाची कामे अडली आहेत. ब्राह्मणटोला, बिनाखी, सुकळी गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर कामांना सुरुवात करण्यात आली नाही. या मार्गावर मोरीचे बांधकाम पूर्ण झाले आहेत. डांबरीकरण व सिमेंट रस्ता, नाली बांधकाम करण्यात आले नाही. यामुळे मार्गावरून पायदळ चालणे कठीण होत आहे. मोरी बांधकामाचे पुलावरून साधे वाहन चालविताना अपघात होत आहे. मोरी बांधकामाच्या पुलावर खड्डे पडले आहेत. याच मार्गावरील पूल धोकादायक झाले आहेत. अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याचे कडेला मातीकाम झाले नाही. रस्त्याचे कडेला शेत शिवाराचे अतिक्रमण झाले आहे. झुडपे वाढल्याने नागमोडी वळणावरुन येणारी वाहने दिसत नाही. यामुळे रस्त्याचे कडेला असणारी झुडपे हटविण्याची मागणी सुरू झाली आहे. महालगाव ते गोंडीटोला गावांना जोडणाऱ्या ३ किमी अंतराच्या मार्गाची अवस्था वाईट झाली आहे. कंत्राटदारांनी रस्त्याचे कडेला डांबरीकरणासाठी गिट्टी घातली आहे. ही गिट्टी थेट रस्त्यावर आली असल्याने रोज अपघात वाढले आहेत. रस्त्यावर डबके तयार झाले आहेत. रस्त्यावर चिखलच चिखल तयार झाले आहेत. अपघाताच्या भीतीने रात्री प्रवास करताना जिकिरीचे ठरत आहे. गावात सिमेंट रस्त्याची कामे झाली नाहीत. यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. गोंडीटोला गावाला जोडणारे दोन्ही रस्ते त्रासदायक झाले आहेत. या दोन्ही रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण व सिमेंट रस्ता बांधकाम करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
बॉक्स
वृक्षारोपणाचे औचित्य काय
भंडारा-बपेरा-बालाघाट राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आल्याचा उदोउदो करण्यात येत आहे. सोशल मीडिया, तथा श्रेय घेण्याचे मोठंमोठे होर्डिंग लावण्यात आले आहे. चौपदरीकरण होणार असल्याने परिसरातील नागरिक अपेक्षेने पाहत आहेत. रस्त्याचे कडेला असणाऱ्या अनेक घरांवर बुलडोझर धावणार आहेत. या भीतीने अनेकांचा रक्तदाब वाढला आहे. सत्य माहितीचा शोध घेण्याचा प्रयत्न होत आहे. निश्चितच या मार्गाचे चौपदरीकरण झाले पाहिजे असे बहुसंख्य नागरिकांचे मत आहे. दरम्यान, चौपदरीकरण रस्ता बांधकामात अनेक वृक्ष बळी जाणार आहेत. रस्त्याचे कडेला असणारे विजेचे खांब हटविले जाणार आहेत. शासकीय कार्यालयांना फटका बसणार आहेत. ही सर्व कल्पना असताना वीज वितरण कंपनी चुकली आहे. गेल्या वर्षात थ्री फेज विद्युत खांब रस्स्त्याचे कडेला उभे केले आहेत. हा भुर्दंड वीज ग्राहकांना बसणार आहे. सध्या स्थितीत वृक्षारोपण करण्यात येत आहे. रस्त्याचे कडेला बेधडक कामे सुरू आहेत. शासनाच्या निधीचे वारे न्यारे होत आहेत. यावरून चौपदरीकरण रस्ता बांधकाम मंजुरीवर शंका निर्माण झालेल्या आहेत.