स्वच्छ शहर स्पर्धेसाठी पालिका प्रशासनाची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 10:27 PM2018-01-11T22:27:04+5:302018-01-11T22:27:13+5:30
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ सुरू झालेले आहे. पवनी नगरात स्वच्छ सर्वेक्षण टिम पोहचली. टिमने अंतर्गत मुल्यमापन व लोकसहभागाची पातळी याबाबी जाणून घेणे सुरू केलेले आहे.
अशोक पारधी।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ सुरू झालेले आहे. पवनी नगरात स्वच्छ सर्वेक्षण टिम पोहचली. टिमने अंतर्गत मुल्यमापन व लोकसहभागाची पातळी याबाबी जाणून घेणे सुरू केलेले आहे. नगरातील सर्व प्रभागात स्वच्छता राहावी यासाठी पालिका प्रशासन रात्रंदिवस डोळ्यात अंजन घालून जागता पहारा देत आहे. स्वच्छ शहर स्पर्धेत अव्वलस्थान पटकाण्यासाठी पवनी नगर पालिका प्रशासनाची धडपड सुरू आहे.
नगरातील लहान मोठ्या रस्त्यावर धुळ राहु नये यासाठी काळजी घेतल्या जात आहे. हागणदारीमुक्त शहर घोषित झाल्याने एकही नागरिक उघड्यावर शौचास जावू नये यासाठी शिक्षक व न.प. कर्मचाऱ्यांचे पथक तळमळीने गावकुसाबाहेर पहारा देत आहेत. नगरात प्रवेश करणारे सर्व रस्ते कचरामुक्त करण्यात आलेले आहेत. गावात सर्वत्र नगरसेवकांच्या प्रयत्नामुळे रस्त्यावर, घरासमोर रांगोळ्या रेखाटल्या गेलेल्या आहेत. नगरात एकमेव असलेला बालोद्यान मोठ मोठी झाडे लागवड करून सुशोभित करण्यात आलेला आहे. जवाहर गेट ते वैनगंगा नदीवरील पुलापर्यंत दुतर्फा रॉयल पॉमची झाडे लावून रस्त्याचे सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. रस्त्याचे दुतर्फा वाढलेले झाडे झुडपे नाहिसे करून निलज कारधा राज्य मार्गाचा नगरातील भाग लक्षवेधी करण्यात आलेला आहे. गावातील मुख्य रस्त्याचे शहरीकरण करण्यात आलेले आहे. स्वच्छतेच्या अंतिम टप्प्यात लोकसहभाग वाढविण्याचा पालिका प्रशासन प्रयतन करीत आहे.
नगरातील सार्वजनिक शौचालयाचे सुशोभिकरण करून पाणी व विद्युत सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ओला व सुका कचरा टाकण्यासाठी चौकाचौकात व शौचालयाबाहेर कचरा कुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. पालिकेची सर्व कामे बाजूला सारून प्रशासनाने स्वच्छतेचा ध्यास घेतल्याचे नगरात दिसून येत आहे. अशीच स्वच्छता नगरात दिर्घकाळ टिकून राहावी यासाठी पालिका प्रशासनाने जागृत राहाणे आवश्यक आहे.