अंत्यसंस्कारावर पालिकेचे ९६ लाख रुपये खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:23 AM2021-06-10T04:23:55+5:302021-06-10T04:23:55+5:30
भंडारा : कोरोनाने दगावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी भंडारा नगर परिषदेने स्वीकारली आहे. अंत्यसंस्कारासाठी नगर परिषद प्रशासनाने ९६ लक्ष ...
भंडारा : कोरोनाने दगावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी भंडारा नगर परिषदेने स्वीकारली आहे. अंत्यसंस्कारासाठी नगर परिषद प्रशासनाने ९६ लक्ष रुपये खर्च केले आहेत. आतापर्यंत पालिकेच्या वतीने १२००पेक्षा जास्त मृतदेहांवर अंत्यविधी पार पाडण्यात आला आहे.
कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सहसा कोणी पुढे येत नाही. अशा वेळी रक्ताचे नातेसंबंधही दूर सारतात. दुरूनच दर्शन करून अनेक जण घरी निघून जातात. मात्र अशावेळी अंत्यसंस्कारासाठी भंडारा नगरपरिषदेने हे सामाजिक उत्तरदायित्व स्वतःच्या खांद्यावर घेतले. गत वर्षापासून कोरोनामुळे १०५५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या सोबतच संशयित व्यक्ती ही मृत्युमुखी पावले होते. अंत्यसंस्काराच्या विधीसाठी आतापर्यंत भंडारा पालिकेला ९६ लक्ष रुपये खर्च आला आहे. यासोबतच राख भरणे, अस्थी गोळा करणे, विसर्जन करणे आदी कामेही पालिकेचे कर्मचारी सातत्याने पार पाडत आहेत. रुग्णालयातून सात कर्मचारी मृतदेह गिरोला येथे निर्मित स्मशान घाटात आणतात. पाच व्यक्ती मृतदेह उचलून आणतात. स्मशानघाटात कार्यरत पालिकेचे दहा कर्मचारी अंत्यविधी पूर्ण करतात. या प्रसंगी कोरोना नियमांचे तंतोतंत पालन केले जाते.
एका अंत्यसंस्कारासाठी आठ हजारांचा खर्च
मृतदेह रुग्णालयातून ते स्मशान घाटापर्यंत आणणे व त्यानंतर अंत्यविधीसाठी एका मृतदेहावर जवळपास आठ हजार रुपयांचा खर्च होत असतो. हा सर्व खर्च नगरपरिषद करीत आहे.
आतापर्यंत पर्यंत बाराशेपेक्षा जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले आहे.
स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी
कोरोनाने मृत्युमुखी पावलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार याची जबाबदारी भंडारा नगर परिषदेतील स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांवर देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांनी कर्तव्य इमानेइतबारे बजावले आहे. महामारीतही नियमांचे पालन या कर्मचाऱ्यांनी केले आहे.
कोट बॉक्स
कोरोनाच्या दुसरा लाटेत कोरोनाग्रस्त सर्वाधिक मृत्युमुखी पडले. एका दिवशी २५ ते ३० मृतदेहांवर अंत्यसंस्कार पाडावे लागले. कौटुंबिक जबाबदारी दूर सारून हे कर्तव्य आम्ही निभावत आहेत.
-एक स्वच्छता कर्मचारी, नगर परिषद, भंडारा
भंडारा तालुक्यातील गिरोला येथे कोविड स्मशानभूमीची निर्मिती करण्यात आली आहे. या स्मशानभूमीत कोरोनाने मरण पावलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. यासाठी भंडारा नगरपरिषदेचे स्वच्छता विभागातील कर्मचारी सातत्याने आपली सेवा देत आहेत. सरण रचण्यापासून ते अस्थी विसर्जनापर्यंतचे कार्यही ते पार पाडीत आहेत.
-विनोद जाधव, मुख्याधिकारी, नगर परिषद, भंडारा