नगर परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:24 AM2021-07-04T04:24:12+5:302021-07-04T04:24:12+5:30
पवनी नगराची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता ते तालुक्याचे व वर्दळीचे ठिकाण आहे. व्यावसायिक, नोकरदार, शेतकरी वर्ग या शहरांत स्थायिक ...
पवनी नगराची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता ते तालुक्याचे व वर्दळीचे ठिकाण आहे. व्यावसायिक, नोकरदार, शेतकरी वर्ग या शहरांत स्थायिक आहेत व ते गुण्यागोविंदाने राहत आहेत. जिल्ह्यातील सर्वांत जुनी नगरपरिषद म्हणून पवनी नगर परिषदकडे पाहिले जाते. नगरात विकासाची अनेक कार्ये सुरू आहेत; पण त्याकडे लक्ष देणारे अधिकारी नाहीत. पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्यात आली. त्यासाठी खोदलेले रस्त्याचे काँक्रीट व माती रस्त्यांवर पसरली आहे. पावसाळ्यात माती ओली होऊन संपूर्ण शहरात चिखल होतो आहे; त्यामुळे चालणे, गाडीवरून जाणे धोकादायक ठरत आहे. जवाहर गेट ते वैनगंगा नदी या दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर गेल्या कित्येक महिन्यांपासून बांधकाम सुरू आहे; परंतु अजूनही पावसाळ्यापर्यंत पूर्ण झाले नाही; त्यामुळे त्या रस्त्यावर खड्डे पडून आहेत; त्यामुळे अपघात वाढले आहेत. वरील समस्या व इतर अनेक समस्यांवर चर्चा करण्यासाठी सिटीझन फोरमचे सदस्य २०-२२ दिवसांपासून मुख्याधिकारी यांना वेळ देण्यासाठी आग्रह करीत आहेत; परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे तुमसर व भंडारा येथील कार्यालयांचा कार्यभार असल्यामुळे ते पवनीला रोज येऊ शकत नाहीत. जनतेला समस्यांसाठी भेटायचे असल्यास भंडाऱ्याला जा असे उद्धट उत्तर नगर परिषोच्या कार्यालयातून मिळत आहे; त्यामुळे अधिकारी व जनता यांतील संवाद तुटला आहे आणि समस्या अधिकच वाढत आहेत.
सिटीझन फोरमचे सदस्य व जनता रोज मुख्याधिकारी कधी येणार म्हणून पाच-सहा तास वाट पाहत असते; परंतु साहेब कधी येणार याचा कुणालाच थांगपत्ता नसतो. पवनी नगर परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी असावा. प्रभारी पद देऊन प्रशासन जनतेची थट्टा व पिळवणूक करीत आहे. येणाऱ्या काळात शहरात चिखलामुळे अपघात किंवा खड्डे असलेल्या रस्त्यांवर अपघात झाले व कुणाचा जीव गेला, रुग्ण दगावला किंवा अपंगत्व आले तर सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील. त्यासाठी कायदेशीर, न्यायालयीन मार्ग अवलंबिले जातील, असा गंभीर इशारा राज्याचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिलेला आहे. निवेदनावर सिटीझन फोरमचे वैभव बावनकर, संघर्ष अवसरे, योगेश बावनकर, निशांत नंदनवार, हिमांशू थोटे, कुणाल हटवार, हिमांशू बावनकर, कुणाल चामोर्शीकर, रितेश झगडू, पारितोष वंजारी, निखिल शहारे यांनी स्वाक्षरी केलेली आहे.