प्रियकराच्या मदतीने पतीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 05:00 AM2020-12-13T05:00:00+5:302020-12-13T05:00:21+5:30
मृतदेहाची पाहणी करताना पॅन्टच्या खिश्यात आढळलेल्या कागदपत्रावरुन ओळख पटली. नंदकिशाेर सुरजलाल रहांगडाले असे मृताचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. पाेलिसांनी तपासाचे चक्र फिरविले. एक पथक गाेंदिया जिल्ह्यातील नवाटाेला येथे पाेहाेचले. नंदकिशाेरची पत्नी याेगेश्वरी उर्फ गुड्डी हिच्याकडून माहिती घेतली. त्यावेळी तीच्यावरच संशय बळावला. गुड्डीची सखाेली विचारपूस करुन संबंधितांची गाेपनीय माहिती मिळविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे पाेलीस तपासात निष्पन्न झाले आणि वैनगंगा नदीत काेरंभी येथे पाेत्यात आढळलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडले. पत्नीसह तिघांना पाेलिसांनी शनिवारी दुपारी अटक केली असून मृतक आणि आराेपी गाेंदिया जिल्ह्यातील असल्याचे पुढे आले आहे.
नंदकिशाेर सुरजलाल रहांगडाले (३४) रा. नवाटाेला ता. गाेरेगाव, जि. गाेंदिया असे मृताचे नाव आहे. तर बांधकाम ठेकेदार सामेश्वर पुरणलाल पारधी (३९) रा. पाथरी जि. गाेंदिया, लेखाराम ग्यानीराम टेंभरे (३९)रा. मुंडीपार जि. गाेंदिया आणि पत्नी याेगेश्वरी उर्फ गुड्डी रहांगडाले (३२) रा. नवाटाेला अशी आराेपींची नावे आहेत. भंडारा पाेलिसांनी अवघ्या २४ तासात मृतदेहाची ओळख पटवून आराेपींना अटक केली.
भंडारा शहरालगतच्या काेरंभीदेवी येथील वैनगंगा नदीपात्रात गुरुवारी सायंकाळी पाेत्यात बांधलेला मृतदेह मासेमार तरुणांना आढळून आला हाेता. या घटनेची माहिती हाेताच जिल्हा पाेलीस अधिक्षक वसंत जाधव यांच्या सुचनेवरुन अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व भंडारा शाखेचे पथक घटनास्थळी रवाना झाले. मृतदेह पाेत्यातून बाहेर काढला, तेव्हा त्याच्या डाेक्यावर माराच्या खुणा आढळून आल्या. खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नदीत फेकल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन भंडारा पाेलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला.
मृतदेहाची पाहणी करताना पॅन्टच्या खिश्यात आढळलेल्या कागदपत्रावरुन ओळख पटली. नंदकिशाेर सुरजलाल रहांगडाले असे मृताचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. पाेलिसांनी तपासाचे चक्र फिरविले. एक पथक गाेंदिया जिल्ह्यातील नवाटाेला येथे पाेहाेचले. नंदकिशाेरची पत्नी याेगेश्वरी उर्फ गुड्डी हिच्याकडून माहिती घेतली. त्यावेळी तीच्यावरच संशय बळावला. गुड्डीची सखाेली विचारपूस करुन संबंधितांची गाेपनीय माहिती मिळविली. त्यात बांधकाम ठेकेदार रामेश्वर पारधी, लेखाराम टेंभरे आणि गुड्डी रहांगडाले यांनी खून केल्याचे पुढे आले. पाेलिसांनी माेठ्या शिताफीने रामेश्वर पारधी याला ताब्यात घेतले. तसेच लेखारामलाही ताब्यात घेवून चाैकशी सुरु केली. त्यावेळी या खून प्रकरणाचे रहस्य उलगडले.
या प्रकरणाचा तपास पाेलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, सहायक पाेलीस निरीक्षक लांबाडे, मटामी गायकवाड, पवार, पाेलीस उपनिरीक्षक उईके, गभणे, हवालदार तुळशीराम माेहरकर, नीतीन महाजन, विजय राऊत, दिनेश आंबाडारे, ईश्वर कुथे, शिपाई मंगेश माळाेदे, चवरे यांच्यासह भंडाराचे ठाणेदार सुधाकर चव्हाण, पाेलीस उपनिरीक्षक अरविंदकुमार जगणे, सहायक फाैजदार श्रीवास, जमादार बापु भुसावळे, पाेलीस नायक बुरडे, भांगाडे, बन्साेड यांनी केली. अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक अशाेक जटाळ करीत आहे.
सालेभाटाजवळ डाेक्यात घातली लाेखंडी सळाख
नंदकिशाेर रहांगडाले आणि पत्नी गुड्डी रहांगडाले हे दाेघे माेटारसायकलने ४ डिसेंबर राेजी वलनी खापरखेडा येथून नागपूर - भंडारा मार्गे स्वगावी जात हाेते. लाखनी तालुक्यातील सालेभाटाजवळ नियाेजीत कटाप्रमाणे रामेश्वर पारधी आणि लेखाराम टेंभरे एका चारचाकी वाहनातून सालेभाटाजवळ पाेहाेचले. तेथे नंदकिशाेर आणि पत्नी गुड्डी उभी हाेते. त्यांच्याजवळ जावून नंदकिशाेरच्या डाेक्यात लाेखंडी सळाखीने वार करुन ठार मारले. त्यानंतर या तिघांनी मृतदेह एका पाेत्यात भरुन भंडारा येथील वैनगंगा नदीच्या माेठ्या पुलावरुन नदीपात्रात फेकून दिले.
चार वर्षांपासून प्रेमप्रकरण
गुड्डी रहांगडाले आणि बांधकाम ठेकेदार सामेश्वर पारधी यांचे चार वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरु हाेते. या प्रकरणाची माहिती पती नंदकिशाेरला मिळाली हाेती. त्यामुळे या अनैतिक संबंधातील अडथळा दूर करण्यासाठी कट रचला आणि त्यात नंदकिशाेरचा प्राण गेला. नंदकिशाेरच्या मागे एक मुलगा, एक मुलगी आहे. नंदकिशाेरचा मृत्यू झाला तर पत्नी आता अटकेत आहे. त्यामुळे दाेन्ही मुले उघड्यावर आली आहेत.