जनावर धुण्याचे पाणी अंगणात आले; काठीने डोक्यात वार करून शेजारी शेतकऱ्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 12:31 PM2022-04-13T12:31:23+5:302022-04-13T12:40:54+5:30
याप्रकरणी कारधा पोलिसांनी एकाच परिवारातील चार जणांवर खुनाचा गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
भंडारा : जनावर धुण्याचे पाणी अंगणात आल्याच्या वादात काठीने वार करून शेजारी शेतकऱ्याचा खून करण्याची घटना भंडारा तालुक्यातील मानेगाव बाजार येथे सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. तर मुलगा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी कारधा पोलिसांनी एकाच परिवारातील चार जणांवर खुनाचा गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
महादेव श्रीपत बोंदरे (५६) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तर दिनेश महादेव बोंदरे (३५) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी चंद्रशेखर विठोबा मते (५०), विक्की चंद्रशेखर मते (२४), मयूर चंद्रशेखर मते (१९) आणि सरिता चंद्रशेखर मते (४७) सर्व रा. मानेगाव बाजार यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. महादेव बोंदरे आणि चंद्रशेखर मते यांचे शेजारी घर आहे. गत तीन-चार वर्षांपासून त्यांच्यात वाद सुरू आहे.
सोमवारी सायंकाळी महादेव आपल्या घरासमोरील रस्त्यावर जनावरे धूत होता. ते पाणी चंद्रशेखर मते यांच्या घरात गेले. या क्षुल्लक कारणावरून वाद झाला. वादात रात्री ९.३० वाजताच्या सुमारास चंद्रशेखरने महादेव व दिनेशला जीवानिशी ठार मारू अशी धमकी देत मारहाण सुरू केली. तेवढ्यात विक्की मते याने घरातून लाकडी काठी आणून दिनेशच्या डोक्यावर मारली. त्यात तो गंभीर जखमी झाला.
हा प्रकार पाहून वडील महादेव धावून आले. वाचविण्याचा प्रयत्न सुरू असताना चंद्रशेखरने महादेवचे दोन्ही हात पकडून विक्कीने त्याच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. दोघेही बापलेक गंभीर जखमी झाले. जखमींना रात्री १० वाजता दोघांनाही भंडाऱ्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिनेशवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी दिनेश बोंदरे याने दिलेल्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध कारधा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. रात्रीच सर्व आरोपींना अटक करण्यात आली. घटनेची माहिती होताच पोलीस अधीक्षक वसंत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, ठाणेदार राजेशकुमार थोरात, बीट जमादार शंकर चौधरी यांनी घटनास्थळ गाठले.