रानडुक्कराचा बनाव फसला :बोरी येथील तेजराम राऊत यांचा खुनच, आरोपीस अटक
By युवराज गोमास | Published: August 26, 2023 07:06 PM2023-08-26T19:06:46+5:302023-08-26T19:06:58+5:30
पंधरा दिवसानंतर झाला खूनचा उलगडा
भंडारा : मोहाडी तालुक्यातील करडी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या बोरी (पांजरा) येथील तेजराम पतिराम राऊत (६०) याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. करडी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा भंडाराच्या पथकाने आरोपीस अटक केली आहे. संजय (पिंटू) गोपाळ राऊत (३७) रा. बोरी, असे आरोपीचे नाव आहे. त्याने आपणच खून केला असल्याचे कबुल केले आहे. या प्रकरणात आणखी आरोपी असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी आज घटनास्थळाची पाहणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागूल यांनी करडी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीची चौकशी केली. प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला २६ ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
मृतक तेजराम राऊत हा ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.१५ वाजता गंभीर गंभीर जखमी अवस्थेत आढळला होता. त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र करडी येथे नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले होते.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला रानडुक्कराने मारल्याची तक्रार वनविभागाकडे करण्यात आली होती. मात्र, दोनदा वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी चौकशी केली असता रानडुकराचे निशान आढळून आले नाही. पंचनाम्यातही कुणीही घटना पाहिल्याचे नमूद केले नव्हते. दरम्यान करडी पोलिसांनी मर्ग नोंद केला होता.
प्रकरणी पोलिस अधीक्षक मतानी लक्ष घालीत स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांना या प्रकरणातील सत्य शोधून आरोपीस अटक करण्याचे निर्देश दिले होते.