मोहाडीत सराईत चोरट्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 05:00 AM2020-04-18T05:00:00+5:302020-04-18T05:00:44+5:30
तलवार घेवून ते पाच जण शहरातील इंदिरा वॉर्डातील मोबाईल टॉवरजवळ लपून बसले. रात्री ८.३० वाजता चंद्रशेखर तेथे येताच पाच जणांनी अचानक चंद्रशेखरच्या गळ्यावर तलवारीने वार केला. यावेळी झालेल्या झटापटीत तीन आरोपीही जखमी झाले. मात्र तलवारीचा वार गळ्यावर लागल्याने काहीवेळातच चंद्रशेखर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याचवेळी बाजूला असलेला मोठा दगड तीनदा त्याच्या डोक्यात घालण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : चोरीचे अनेक गुन्हे शिरावर असलेल्या सराईत चोरट्याचा जुन्या वैमनस्यातून तलवारीने वार व डोक्यात दगड घालून खून करण्याची घटना मोहाडी येथे गुरूवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी याप्रकरणात अवघ्या तासाभरात पाच जणांना अटक केली. लॉकडाऊनच्या काळात घडलेल्या घटनेने मोहाडी शहरात खळबळ उडाली.
चंद्रशेखर ऊर्फ रवरान काशीनाथ निपाने (३५) रा. टिळक वॉर्ड मोहाडी असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी राहूल मनोहर हेडाऊ (१९), आनंद मनोहर हेडाऊ (२०) रा. गांधी वॉर्ड, उमेश झाडू मारबते (२०), दिनेश झाडू मारबते (२५) आणि नितीन नरेश मारबते (२३) अशी आरोपींची नावे आहेत. चंद्रशेखर निपाने आणि आरोपींमध्ये जुन्या वैमनस्यातून नेहमी वाद होत होता. तो या आरोपींना धमक्या देवून मारहाण करायचा. घटनेच्या दिवशीसुद्धा चंद्रशेखरने उमेश मारबते याला बेदम मारहाण केली. त्यामुळे या पाच जणांनी मिळून त्याचा काटा काढण्याचे ठरविले.
तलवार घेवून ते पाच जण शहरातील इंदिरा वॉर्डातील मोबाईल टॉवरजवळ लपून बसले. रात्री ८.३० वाजता चंद्रशेखर तेथे येताच पाच जणांनी अचानक चंद्रशेखरच्या गळ्यावर तलवारीने वार केला. यावेळी झालेल्या झटापटीत तीन आरोपीही जखमी झाले.
मात्र तलवारीचा वार गळ्यावर लागल्याने काहीवेळातच चंद्रशेखर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याचवेळी बाजूला असलेला मोठा दगड तीनदा त्याच्या डोक्यात घालण्यात आला. त्यामुळे चंद्रशेखरचा जागीच मृत्यू झाला. मरण पावल्याची खात्री केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला.
या घटनेची माहिती होताच परिसरात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली. मोहाडी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. ठाणेदार निशांत मेश्राम तात्काळ पथकासह घटनास्थळावर पोहचले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मात्र नेमका कोणी आणि कशासाठी खून केला हे सुरूवातीला कळायला मार्ग नव्हते. मात्र ठाणेदार मेश्राम यांनी तपासाचे चके्र फिरवून पाचही आरोपींना अवघ्या तासभरातच जेरबंद केले.
चंद्रशेखर हा सराई चोरटा गुंड प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर चोरी व मारहाणीचे अनेक गुन्हे आहेत. मोहाडी येथील एका सोनाराचे सोने लुटून रायपूर येथे विकताना त्याला दोन वर्षापुर्वी अटक करण्यात आली होती. तसेच मोहाडी येथील एका मोठ्या चोरीतही त्याला अटक झाली होती. या घटनेचा तपास ठाणेदार निशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बंडू थेरे, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण जाधव करीत आहेत.
आरोपी एमआयडीसी परिसरात बसले लपून
खून करून पसार झालेले हे पाचही जण मोहाडी एमआयडीसी परिसरात लपून बसले होते. पोलिसांना याची माहिती होताच तेथून त्यांना अटक करण्यात आली. जुन्या वैमनस्यातून आपण खून केल्याची कबूली त्यांनी पोलिसांपुढे दिली. या पाच जणांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले असता नितीन मारबते, उमेश मारबते व दिनेश मारबते यांना मार लागल्याचे दिसून आले. तर राहूल आणि आनंद हेडाऊ या दोघांना न्यायालयापुढे हजर केले असता रविवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. उर्वरित तिघांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरून शुक्रवारी सायंकाळी अटक केली.