वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा धारदार शस्त्राने खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:57 AM2021-05-05T04:57:52+5:302021-05-05T04:57:52+5:30
वैभव सुमेश नगरारे (२४, रा. नेहरू वार्ड, वरठी) असे मृताचे नाव आहे. तर जयश शिंदे, जोशेल शिंदे व बब्बू ...
वैभव सुमेश नगरारे (२४, रा. नेहरू वार्ड, वरठी) असे मृताचे नाव आहे. तर जयश शिंदे, जोशेल शिंदे व बब्बू शेख अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. वैभव ट्रक क्लीनर म्हणून काम करत होता. संचारबंदी असल्याने तो घरीच होता. वडील सुमेश नगरारे बांधकाम मजूर आहेत. सोमवारी सायंकाळी ६ वाजता ते कामावरून आल्यावर वैभवने वडिलांना वाढदिवसासाठी पैसे मागितले. वडिलांकडून २०० रुपये घेऊन तो काही मित्रांसोबत बाहेर गेला. रात्री ९ च्या सुमारास मित्र साजन देशभ्रतार, गोल्डी मेश्राम व नितेश वहाने यांच्या सोबत हनुमान वार्डातील चौकात गप्पा मारत होता. त्या वेळी जयश शिंदे याने जुन्या वादाचे विषय काढून दिनेश राठोडने माझ्यावर हल्ला केला तेव्हा तू त्याला साथ दिली, असे म्हणत भांडण सुरू केले. या वेळी सोबतच्या मित्रांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण जयश ऐकण्याच्या स्थितीत नव्हता.
काही वेळातच जयशचा मोठा भाऊ जोशेल शिंदे तेथे आला. त्याने याच विषयावरून वैभववर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. दरम्यान, घटनास्थळावरून वाहनाने पळून जाण्याचा प्रयत्न करताना वैभव दुचाकीच्या खाली उतरला. त्या वेळी जोशेलने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्याला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यावरच न थांबता जोशेलने वैभवच्या छातीवर सपासप वार केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
पाच महिन्यांपूर्वी जयश शिंदे याच्यावर दिनेश राठोडने हल्ला केला होता. या वादात वैभवने मदत केल्याचा राग होता. दिनेश राठोड व त्याच्या सहकाऱ्यांनी जयशला मारहाण केल्यापासून तो अपंगाप्रमाणे जीवन जगत आहे. जुन्या प्रकरणाचा वचपा घेण्यासाठी सदर खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना लावला आहे. या घटनेची माहिती वरठी पोलिसांना होताच अवघ्या अर्ध्या तासात आरोपींना जेरबंद केले.
सुमेश नगरारे यांच्या तक्रारीवरून आरोपी जयश शिंदे, जोशेल शिंदे व बब्बू शेख यांच्यावर भादंवि ३०२ व ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहायक निरीक्षक सुबोध वंजारी करीत आहेत. पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील घटनेवर बारीक लक्ष ठेवून आहेत. गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलीस हवालदार गुलाब भोंदे, कुंदन फुलबांधे, संदीप बांते, दिनेश शहारे, शैलेश आगाशे, लांजेवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.